शेतकऱ्यांची उपेक्षा, उद्योगांवर खैरात - राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

नांदेड - भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुटाबुटातील सरकार असून, गुजरातमध्ये उद्योजकांना नॅनो फॅक्‍टरीसाठी हजारो कोटी रुपये द्यायला एका मिनिटात कोणतीही शहानिशा न करता तयार होते; पण गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार, व्यापारी, बेरोजगार यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून अर्जामध्ये जातीचाही उल्लेख करावा लागतो आहे. कर्जमाफीचा फायदा मोजक्‍याच शेतकऱ्यांना झाला आहे. कॉंग्रेस गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यासाठी आपली शक्ती पणाला लावावी, असे आवाहन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केले.

राहुल गांधी यांनी 35 मिनिटांच्या भाषणात भाजप आणि मोदी सरकारवर टीका करत देश आणि राज्यातील अनेक मुद्दे मांडले.

'कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारवर दबाब निर्माण केल्यामुळेच उत्तर प्रदेश त्याचबरोबर महाराष्ट्रातही भाजपचे सरकार नमले आणि कर्जमाफी जाहीर करावी लागली. शेतकरी, शेतमजुरांवर कर्जमाफीसाठी रांगा लावण्याची वेळ आणून त्यांच्यावर अन्याय करत असताना दुसरीकडे मात्र उद्योगांना कोट्यवधी रुपयांची खैरात वाटण्यात येत आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

'नोटाबंदी करून गोरगरिबांची फसवणूक आणि पिळवणूक केली. शेतकऱ्यांचा जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला; पण कॉंग्रेसने त्यांचा प्रस्ताव संसदेत हाणून पाडला. जीएसटी कायद्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याची मागणी केली असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता छोटे दुकानदार, व्यापाऱ्यांवर संपायची वेळ आली. गोरगरिब जनतेच्या, दलित, शोषित, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी ज्यांना ज्यांना या सरकारचा त्रास झाला आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम आगामी काळातही कॉंग्रेस करेल,'' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने नांदेडला नवा मोंढा मैदानावर मराठवाडा विभागीय मेळावा आयोजित केला होता. याला राहुल गांधी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते. नारायण राणे यांची मात्र अनुपस्थिती होती. अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व नेत्यांना निमंत्रण दिले होते, असे सांगितले. दुसरीकडे सिंधुदुर्गात बोलताना राणे यांनी निमंत्रण नसल्याने सभेला गेलो नसल्याचे सांगितले.

राहुल म्हणाले...
- "मेक इन इंडिया'ची नुसती स्वप्ने
- जातींमध्ये भांडणे लावून भाजपकडून सत्ता काबीज
- कॉंग्रेसने नेहमीच सर्वांना सोबत घेऊन काम केले
- कॉंग्रेसच्या विचारधारेला संपविता येणार नाही.
- "भारत जोडो'तून आम्ही सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढू.

नांदेड - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रदेश कॉंग्रेसतर्फे आयोजित मराठवाडा विभागीय मेळाव्यात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अशोक चव्हाण, मोहन प्रकाश, शिवाजीराव पाटील निलंगेकर, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nanded maharashtra news rahul gandhi talking