नांदेडमध्ये पालिकेचा नळाला मीटर बसविण्याचा 'फंडा'; नागरिकांच्या खिशाला बसणार कात्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नवीन नांदेडमधील सिडको परिसराला पाण्याची समस्या कधी जाणवली नाही. परिसरात नळाला तोट्या कुठे अपवादात्मक दिसतील अशा आहेत. अशा परिस्थितीत नळाला आलेले पाणी बिनधास्त सांडणे, विनाकारण तासन्‌ तास बाथरूम मध्ये वाया घालवणे, पाण्याबरोबर मनसोक्त खेळणे या सिडकोवासीयांच्या बहुतांश सवयीला आता लवकरच लगाम बसणार आहे.

नांदेड - नवीन नांदेडमधील सिडको परिसराला पाण्याची समस्या कधी जाणवली नाही. परिसरात नळाला तोट्या कुठे अपवादात्मक दिसतील अशा आहेत. अशा परिस्थितीत नळाला आलेले पाणी बिनधास्त सांडणे, विनाकारण तासन्‌ तास बाथरूम मध्ये वाया घालवणे, पाण्याबरोबर मनसोक्त खेळणे या सिडकोवासीयांच्या बहुतांश सवयीला आता लवकरच लगाम बसणार आहे. पाणी विभागाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी नळाला मीटर बसविण्यासाठी मनपा सरसावली असून त्या दृष्टीने नवीन कनेक्‍शन देण्यात येत असून याबाबत महापालिका आता नळाला मीटर बसविण्याचा "फंडा' उपयोगात आणणार आहे.

पाण्याचा वापर काटकसरीने होण्यासाठी महापालिकेने नळाला मीटर बसविण्याचा निर्णय घेतला असावा, कारण मागील अनुभव पाहता नागरिक स्वत:साठी आवश्‍यक पाणीभरून झाल्यानंतर नळाची तोटी बंद न करता पाण्याचा अपव्यय होण्याचे भयंकर प्रमाण आहे. गाड्या धुणे, स्वच्छतागृहात पाणी सोडणे, बोअरमध्ये पाणी सोडणे, नालीत पाणी सोडून देणे, रस्त्यावर सडा मारणे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला आहे. हा अपव्यय टाळण्यासाठी अनाधिकृत नळजोडण्या अधिकृत करून सर्वच नळांना मीटर्स बसविण्याचे नियोजन आता मनपाने सुरू केले आहे. त्यासाठी मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार असून परिसरात त्या दृष्टीने नवीन कनेक्‍शन देण्यात आलेले आहेत.

सिडको अनेक भागात नवीन कनेक्‍शन देण्याचे काम सुरू असून मीटरचे वाटपही करण्यात येत आहे. शेजारील लातूर जिल्ह्याचा अनुभव घेतल्यास तेथील नागरिकांना पाण्यासाठी किती प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागला हे सर्वश्रुत आहे. सिडको वासियांना पाणी कधी कमी पडले नाही पण काटकसरीने उपयोग केल्यास कधी कमीही पडणार नाही. पाणी वाचवने आणि काटकसरीने वापरणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. परंतु आता मात्र प्रशासन नागरिकांवर विश्वास न ठेवता आता सर्वच नळांना मीटर बसवित असल्याने आपोआपच यास आळा बसणार असून मीटरच्या रीडिंग प्रमाणे नागरिकांना पाण्याचे पैसे मोजावे लागणार आहेत. आजच्या परिस्थितीत काही ठिकाणी मुबलक, तर कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, शिवाय परिसरातील सर्वच नळ उघडे असल्याने कोणीही पाणी घ्या अशा सतत घडणाऱ्या गोष्टीला येणाऱ्या काळात आळा बसणार आहे.

नागरिकांचा विरोध होण्याची शक्‍यता
ज्यावेळी लाईट खात्याचे डिजिटल मीटर आले त्यावेळी ते स्वीकारण्यास व आपल्या घरास बसवून घेण्यास अनेक नागरिकांनी विरोध दर्शविला होता. प्रसंगी बाहेरील मीटर मुळे अनेकांच्या मीटर फोडीच्या घटनाही त्यावेळी घडल्या होत्या. खरेतर पाणी जपून आणि मोजून वापरावे पाणी वापराबद्दल कोणतेही कडक निर्बंध, दंडक, पाण्याचे मीटर कोणालाच नको असते. कारण ठरलेली पाणीपट्टी केव्हातरी भरायची आणि पाणी भरपूर वापरायचे असे अनेक वर्षांपासून चालले असून पाण्याची किंमत द्यायला नागरिक सहजासहजी तयार होतील का? हेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. विष्णुपुरी प्रकल्पामुळे पाणी असताना येणाऱ्या भविष्यामधील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी समर्थ रहावे यासाठी मीटर बसणे आवश्‍यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Web Title: nanded news cidco news corporation news water meter