चव्हाणांचे नांदेड अभेद्यच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

भाजपकडून होत असलेल्या खोट्या प्रचाराला आणि भूलथापांना नांदेडकरांनी धुडकावून लावले आहे. त्यामुळे भाजपचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
- अशोक चव्हाण,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

नांदेड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या दोन दिग्गजांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत आज काँग्रेसने बाजी मारत भाजपसह अन्य विरोधकांना अक्षरशः चारीमुंड्या चीत केले. महापालिकेच्या ८१ पैकी ७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यातील ६९ जागा जिंकत काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत ११ जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘एमआयएम’ला आणि गेल्या वेळी सहा जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी भोपळाही फोडता आला नाही; तर भाजपला सहा जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या पदरात अवघी एक जागा  पडली.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असाच सामना होता. आज मतमोजणी झाली आणि अनपेक्षितपणे काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सर्वांनाच चारीमुंड्या चीत केले. नांदेड महापालिकेच्या एकूण ८१ जागांसाठी काँग्रेसने ८१, भाजपने ८०, शिवसेनेने ७३, राष्ट्रवादी काँग्रेसने ५७, ‘एमआयएम’ने ३२, समाजवादी पक्षाने २४, बहुजन समाज पक्षाने १७ उमेदवार उभे केले होते. या प्रमुख पक्षांव्यतिरिक्त इतर प्रमुख आणि अपक्ष असे ५७८ उमेदवार रिंगणात होते. यंदा ६५ टक्के मतदान झाले होते, तसेच प्रचार जोरदार झाला होता. त्यामुळे सर्वांनाच निकालाची उत्सुकता होती. 

आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली आणि प्रथमपासून काँग्रेसने आघाडी घेत भाजप, शिवसेना, ‘एमआयएम’, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांचाच धक्कादायकरीत्या पराभव केला. काँग्रेसने आणि प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला ६१ पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्यापेक्षाही जास्त जागा देत नांदेडकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत मोठ्या मताधिक्‍याने काँग्रेसला विजयी केले. 

यंदा तरोडा बुद्रुक या एका प्रभागात प्रथमच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र बसविण्यात आले होते. त्या ठिकाणचा निकाल वगळता इतर ७८ जागांचे निकाल जाहीर झाले असून, काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला सहा, तर शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्ष अवघ्या तीन मतांनी निवडून आला आहे. विशेष म्हणजे ‘एमआयएम’ला गेल्या वेळेस ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा मिळाल्या होत्या. आजच्या मतमोजणीत या दोघांना खातेही उघडता आले नाही. त्यामुळे विरोधकांचे अक्षरशः पानिपत झाले. 

निवडणुकीचा कल लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजीनगरसह इतर सर्वच भागांत, तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयाचे फटाके फोडून आणि ढोल- ताशांच्या गजरात गुलाल उधळून पेढे, साखर वाटत स्वागत केले. विजयी उमेदवारांचेही प्रभागात जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

नांदेडकर जनतेने विकासाला पाठिंबा दिल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी आभार मानले. भाजपकडून होत असलेल्या खोट्या प्रचाराला आणि भूलथापांना नांदेडकरांनी धुडकावून लावले आहे. त्यामुळे भाजपचा आता परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जनतेच्या निकालाचा आम्ही सन्मानच करतो. दिवा पूर्णपणे विझण्यापूर्वी थोडातरी फडफडतो, तसाच काँग्रेसचा विजय आहे. 
- रावसाहेब दानवे,  भाजप प्रदेशाध्यक्ष

पोटनिवडणुकीत भाजपचे आघाडीसह यश
भाजपने मुंबई आणि नागपूर महापालिकांच्या पोटनिवडणुकीत स्वबळावर बाजी मारली, तर पुणे आणि कोल्हापूर येथे आघाडीसह यश मिळविले. मुंबई महापालिकेच्या भांडुप पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी शिवसेनेला धक्का देत ४७९२ मतांनी विजय मिळविला. जागृती यांना ११,१२९ आणि शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील यांना ६,३३७ मते मिळाली. नागपूर महापालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला निसटते यश मिळाले. पक्षाचे उमेदवार संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव केला. कोल्हापूर महापालिकेच्या एका जागेवर भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा २०० मतांनी पराभव केला. पुण्यातील एका जागेवर भाजप-रिपाइंच्या हिमाली कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांच्याविरुद्ध ४,४८३ मतांनी विजय मिळविला. 

Web Title: nanded news congress ashok chavan