बनावट परीक्षार्थी प्रकरणात तपास यंत्रणाच जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

भगवान झम्पलवाड हे सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. हस्ताक्षर तज्ञ यांनी तपासणी करण्यासाठी पाठवलेला तपासणी अहवाल चुकीचा तयार करून पाठवला होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सोनसकर यांना या पथकाने अटक केली आहे

नांदेड - राज्यभर गाजलेल्या बनावट परीक्षार्थी प्रकरणात आज मध्यरात्री तपास करणाऱ्या यंत्रणेलाच अटक करण्यात आली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. अगोदरच या प्रकरणातील मुख्य सुत्रदारांबरोबर दोन जण पोलीस कोठडीत आहेत.

नांदेडच्या मांडवी पोलीस ठाण्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात एक असे दोन गुन्हे दाखल झाले. त्यात बनावट परीक्षार्थी तयार करून अनेकांना स्पर्धा परीक्षा पास करून नोकऱ्या लावल्या. याबाबत मांडवीच्या योगेश जाधव या युवकाने तक्रार देऊन हा प्रकार उघकिला आणला. याबाबत असलेले गांभीर्य पाहता मुखमंत्री देवेंद्र फणवीस यांनी गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकारी- कर्मचारी यांची एक एसआयटी स्थापन करून त्यांच्याकडे तपास करण्याचे अधिकार दिले. नांदेड आणि यवतमाळ येथील दोन्ही गुन्हे या विशेष तपास पथकाकडे दिले. त्यापूर्वी हा तपास नांदेडच्या आणि यवतमाळच्या स्थानिक गुन्हा शाखेकडे होता. तेव्हा नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या आर्थिक गुन्हा शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दिनेश सोनसकर आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी भगवान झम्पलवाड यांनी गुन्ह्याचा तपास करीत होते. एसआयटी स्थापन झाल्यावर तो तपास त्यांच्याकडे वर्ग झाला.

प्रकणातील मुख्य आरोपी नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर राठोड यांचे पुत्र प्रबोध हे उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरीम अटकपूर्व जामिनावर सुखरूप होते. एप्रिल महिन्यात हा अटकपूर्व जामीन न्यायालयाने रद्द केला आणि तपास पथकाने प्रबोध मधुकर राठोडला अटक केली. त्याच्या अटकेनंतर विशेष तपास पथकाने परभणी कृषी विद्यापीठातील कक्ष अधिकारी अरविंद टाकळकर यास पकडले. ते दोघे जण पोलीस कोठडीत आहेत. शुक्रवारी (ता. दोन) मध्यरात्रीनंतर तपास पथकाने पोलीस कर्मचारी भगवान उत्तम झम्पलवाड (ब.न.११९७) आणि औरंगाबादचे हस्ताक्षर तज्ञ योगेश मोतीराम पंचवटकर या दोघांना अटक केली. भगवान झम्पलवाड हे सध्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. हस्ताक्षर तज्ञ यांनी तपासणी करण्यासाठी पाठवलेला तपासणी अहवाल चुकीचा तयार करून पाठवला होता. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सोनसकर यांना या पथकाने अटक केली आहे. या सर्वांची रवानगी सध्या मांडवी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: nanded news: crime