नांदेड जिल्ह्यात बस दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

हदगावजवळ बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील चौदा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

हदगाव (जि. नांदेड) : हदगावजवळ बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील चौदा जण किरकोळ जखमी झाले आहेत.

आज (रविवार) दुपारी हदगावपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बरडशेवाळा-बामणीफाटा येथे हदगावहून नांदेडला जाणाऱ्या उमरखेड-नांदेड बसची व दुचाकीची समोरासमोर धडक होवून दुचाकीवरील दोघे जण जागी ठार झाले. तर बस जवळ जाऊन उलटली. या अपघातात दुचाकीवरील खंडू भिमराव भूरके (वय 34) रा.करमोडी ता.हदगाव व रतन मुंजाजी जयदेवे (वय 40) रा.भुरक्‍याचीवाडी ता.कळमनुरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पत्रकार इस्माईल पिंजारी यांनी घटना कळताच बसच्या चाकात अडकलेल्या मृत्त व्यक्तींना व जखमींना बसच्या बाहेर काढण्याकरिता मदत करुन उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविले.

हदगाव आगाराची बस दुपारी एकच्या दरम्यान हदगावहून नांदेडला जात होती. बस क्रमांक एमएच 40 बीएल 2603 व दुचाकी क्रमांक एमएच 26 एबी 1584 यांची समोरासमोर धडक झाली. या घटनेत दुचाकीवरील दोघेजण चाकाखाली अडकून जागीच ठार झाले. तर बसमधील तिरुपती वसुकर (18) रा. उदगीर, सर्वदा राम मोरे (वय 4) रा. करगाव जि.लातूर, प्रतिक यादवराव गव्हाणे (वय 14) रा. उदगीर, रंगराव बाजीराव बिरादार (वय 66) रगाव, माया रमेश'आडे (वय 30) रा.माहूर, आशिष रमेश'आडे (वय 7) रा. माहूर, अनिता दिलीपराव धर्माधिकारी (वय 30) रा.बरबडा, ज्योती राजू देशमुख (वय 40) रा. उमरखेड, प्रतिभा रामा मोरे (वय 30) रा. खरगांव हे किरकोळ जखमी झाले आहेत.

 

 

Web Title: nanded news marathawada news marathi news bus accident two killed