नांदेड पोलिस भरतीची परीक्षा पुन्हा होणार

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 2 मे 2018

लेखी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका पुरवणे आणि त्या ओ.एम.आर वर स्कॅन करून देण्याचे काम सोपवण्यात आलेल्या मे. एस.एस.जी. सॉफ्टवेअर सोल्युशन्स, पुणे या कंपनीस परीक्षेचे काम देण्यासाठी कायम स्वरुपी बाद ठरवण्यात येत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

नांदेड : येथे १ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आलेल्या पोलिस शिपाई भरतीसाठीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर अखेर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच पोलिस शिपाई भरतीसाठी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच दोषी आढळलेले उमेदवार या परीक्षेसाठी बाद धरले जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले तर ज्या कंपन्या यामध्ये दोषी आढळल्या त्यांना देखील बाद ठरवण्यात आले आहे.

नांदेडमधील पोलिस भरती घोटाळा प्रकरणामुळे महाराष्ट्र पोलिस आणि गृहखात्याची नाचक्की झाल्याचे म्हटले जात असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी एक पत्रक काढले असून त्यामध्ये १ एप्रिल रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली असून नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लेखी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका पुरवणे आणि त्या ओ.एम.आर वर स्कॅन करून देण्याचे काम सोपवण्यात आलेल्या मे. एस.एस.जी. सॉफ्टवेअर सोल्युशन्स, पुणे या कंपनीस परीक्षेचे काम देण्यासाठी कायम स्वरुपी बाद ठरवण्यात येत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, नव्याने घेण्यात येणारे पेपर तपासणीचे काम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली करण्यात यावे आणि परीक्षे दरम्यान व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावे असे आदेशही देण्यात आले आहेत. लवकरच परिक्षेची तारीख कळविण्यात येईल असे पोलिस अधिक्षक चंदकिशोर मीना यांनी सांगितले.

Web Title: Nanded Police recruitment exam rescheduled