नांदेडला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी चुरस

file photo
file photo

नांदेड ः जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी (ता.२१) होत आहे. निवडणूक प्रक्रियेला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता वाढली असून दावेदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सत्तेत स्थान मिळणार असले तरी काँग्रेसकडून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गोटात असंतोष निर्माण झाला आहे. उपाध्यक्षपदावर तोडगा निघाला नाही तर प्रसंगी राष्ट्रवादीची बाहेरुन पाठींब्याची तयारी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीचे सुत्र निश्चित झाले असले तरी काँग्रेसकडून सोमवारी (ता. २०) अधिकृत दावेदारांची घोषणा करण्यात येणार आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र बैठकाद्वारे तशा सुचना दिल्या. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार भाई जगताप यांच्या समोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करताना अध्यक्षासह उपाध्यक्षपदाचा दावा केला.

दावेदारांचा परिचय ठरला चर्चेचा

अध्यक्षपदासाठी प्रबळ व सक्षम उमेदवाराची मागणी करत अंतिम निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव सुटल्याने सत्ताधारी काँग्रेसकडे एकूण चार दावेदर असले तरी प्रमुख सविता वारकड व मंगाराणी अंबुलगेकर यांच्यात चुरस आहे. काँग्रेसच्या स्वतंत्र बैठकीमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी चारही दावेदार महिलांचा उपस्थितांना करुन दिलेला परिचय चर्चेचा विषय ठरला.

काँग्रेसचा उपाध्यक्षपदावर दावा

विद्यमान अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर यांच्या कर्तबगारीच्या विषयावरुन सत्ताधारी काँग्रेसमध्ये चांगलेच घमासान झाल्याचे बोलले जात आहे. विद्यमान अध्यक्षा श्रीमती जवळगावकर यांना सर्वांनी माईचा दर्जा दिला. पूर्वीच्या सभापतीपदाचा दांडगा अनुभव असल्याने त्यांचा कार्यकाळ समाधानकारक राहिला पण अधिकारी ऐकत नसल्याची खंत व्यक्त करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मुद्दा पकडून बरेच घमासान झाले. प्रबळ आणि सक्षम महिलेचीच आता अध्यक्षपदासाठी निवड करा, संख्याबळाच्या तुलनेत उपाध्यक्षपदही पक्षाकडे घेण्याचा सुर पालकमंत्री चव्हाण यांच्या अनुपस्थितीत बैठकीत उमटला.

राष्ट्रवादीचा दावा बळावला

राज्यस्तरावर काही झाले तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक गेल्या पंधरा वर्षापासून बऱ्या वाईट काळात काँग्रेससोबत आहेत. माजी आमदार नाईक यांना त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मागील अडीच वर्षात उपाध्यक्षपद दिले. पण आता महाविकास आघाडीच्या सुत्रानुसार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे समान संख्याबळ असल्याने सत्तेचा पेच प्रसंग निर्माण झाला. त्यातच बापूसाहेब देशमुख गोरठेकर गटातील राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी बैठकीत उपस्थिती लावून राष्ट्रवादीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे उपाध्यक्षपदावरील राष्ट्रवादीचा दावा बळावला.

कोणाची किती जमेची बाजू

मंगाराणी अंबुलगेकर या मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या असून त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या एका गोटातून समोर येत आहे. माजी आमदार अमिता चव्हाण यांच्या विश्वासू, राज्य शासनाच्या कृषी विभागाचे सेवानिवृत्त संचालक सुरेश अंबुलगेकर यांच्या पत्नी, भोकर महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा, माहेरी भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलमध्ये विजय मिळविल्यानंतर सासरी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी सर्कलमधूनही त्यांनी विजय मिळवला. या शिवाय माजी समाजकल्याण सभापती म्हणून काम केले. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

सविता वारकड या मुदखेड तालुक्यातील बारड जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या असून वारकड यांची भोकर विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक संतोष वारकड यांच्या पत्नी अशी त्यांची जमेची बाजू आहे.

राष्ट्रवादीच्या गोटात असंतोष 

जिल्हा परिषदेच्या वाट्याला उपाध्यक्षपदासह दोन सभापती पदे आहेत. शिवसेनेला एक सभापतीपद देण्यास राष्ट्रवादीची संमती आहे. पण उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपदावर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात येत असला तरी अपेक्षेप्रमाणे उपाध्यक्षपदावर तडजोडीचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु आहेत. एवढ्यावरुन तडजोड झाली नाही, तर राष्ट्रवादी बाहेरुन पाठींबा देण्याच्या तयारीत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com