नांदेड- तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस लवकरच 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 20 जानेवारी 2020

रॉयलसीमा एक्सप्रेस रेल्वे लवकरच सुरु करण्याचे आश्‍वासन दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांनी दिले असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

नांदेड : नांदेड- तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस रेल्वे लवकरच सुरु करण्याचे आश्‍वासन दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांनी दिले असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.

खासदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांची सोमवार (ता. २०) जानेवारी रोजी दुपारी रेल्वेच्या सिकंदराबाद येथील कार्यालयात भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले. त्यावेळी रॉयलसीमा एक्सप्रेस रेल्वेचे लवकरच नांदेडपर्यंत विस्तार केला जाईल असे आश्‍वासन गजानन मल्ल्या यांनी शिष्टमंडळास दिले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, रविंद्र पोतगंटीवार, विजय गंभीरे, नगरसेवक प्रशांत दासरवार, उबयनलाल यादव, हजारी आदींचा समावेश होता.

हेही वाचा -Video : शालेय मुलीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांना फाशी झालीच पाहिजे

गजानन मल्ल्यांनी दिला विश्‍वास 

श्री मल्ल्या यांची सोमवारी सिकंदराबाद येथील रेल्वेच्या कार्यालयात भेट घेवून सध्या सुरु असलेली निजामाबाद- तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस ही रेल्वे नांदेडहून तिरुपतीला सोडण्यात यावी. खासदार चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे सध्या दररोज सुरु झालेल्या नांदेड- पनवेल या रेल्वे गाडीचे रेणुकामाता रेल्वे असे नामकरण करण्यात यावे. विशाखापट्टणम व नरसापूर रेल्वेचा थांबा उमरी- धर्माबाद रेल्वे स्थानकावर देण्यात यावे. नांदेड- मनमाड- पुणे ही आठवड्यातून दोन दिवस सुटणारी रेल्वे दररोज सुरु करण्यात यावी. नांदेडहून मनमाडला जाणार्‍या तीन पॅसेंजर रेल्वे सध्या नगरसोलला थांबतात तरी या तीन्ही रेल्वे मनमाड स्थानकापर्यंत सोडण्यात यावे. रेल्वेमध्ये मुदखेडहून फुलाची वाहतुक करण्यास रेल्वे प्रशासनाने घातलेली बंदी उठवून फुल वाहतूकीस परवानगी देण्यात यावी तसेच नांदेडहून पंढरपूर, कोल्हापूर, वैष्णदेवी, कन्याकुमारी या तिर्थक्षेत्र स्थळासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष रेल्वे सुरु करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर केले.

येथे क्लिक करा -  पोलिसांवर हल्ला करून, पुन्हा याल तर...

फूलांची वाहतुक करण्यास परवानगी

खासदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिेलेल्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन श्री मल्ल्या यांनी रॉयलसिमा एक्सप्रेस लवकरच नांदेडपर्यंत सुरु करण्याचे आश्‍वासन देवून शेतकर्‍यांना रेल्वेतून फूलांची वाहतुक करण्यास परवानगी देण्यात येईल. येत्या मार्चपर्यंत मुदखेड ते परभणीपर्यंतचे दुहेरी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल. नव्यानेच सुरु झालेली नांदेड- मुंबई राज्य राणी एक्सप्रेसला वाढीव रेल्वे बोगी जोडण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने सुरु केला असल्याचे आश्‍वासन मल्ल्या यांनी दिले असल्याचे खासदार चिखलीकर यांनी कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded- Tirupati RoyalSima Express soon