‘फिटनेस’साठी नांदेडकरांची पीपल्सवर गर्दी

प्रमोद चौधरी
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

नियमित व्यायाम न केल्यामुळे शारीरिक क्षमता, सहनशक्ती कमी होते. सांधे आखडणे आणि स्नायू दुबळे होणे आदी आरोग्य समस्या लवकर उद्‍भवतात. रक्तातली साखर वाढून मधुमेह होतो. चरबीमुळे रक्तवाहिन्यांत अडथळे येत असल्याने भूक व पचनशक्ती मंदावते.

नांदेड :  जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असतानाच ताणतणावही तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. अगदी पहिलितल्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्याचे परिणाम समोर आले. त्यातून सुटका मिळावी, शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जिवन जगता यावे यासाठी नांदेडकर पिपल्स महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी गर्दी करत आहेत. झपझप चालण्यासोबतच क्रिकेट, बँडमिंटन खेळणे व्यायामाची विविध आसने नांदेडकर ‘फिट’ राहण्यासाठी दररोज करीत आहेत.

व्यायाम म्हणजे आपल्या डोळयासमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोच, पण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहितच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. सद्यस्थितीमध्ये कष्टकरी वर्गाला अन्न कमी मिळते तर खाणा-यांना श्रमच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जीवनात फीट राहण्यासाठी व्यायाम करणे, मैदानावर धावणे, चालणे सक्तीने करण्याची वेळ आली आहे.   
 

हेही वाचा - Video : फिटनेससाठी 25 वर्षांपासून करतोय मॉर्निंग वॉक : डॉ. शिवाजी सुक्रे

लक्षात ठेवा...व्यायाम दिर्घायुष्याची गुरुकिल्ली... 
  
डॉ. अजिंक्य क्षीरसागर  :  जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग्यसमस्या जाणवतील. या सर्व हळूहळू वाढणा-या समस्या असल्याने त्यांची मनुष्याला सवय होऊन जाते. व्यायाम न करणेही अंगवळणी पडते. व्यायामाची आवड लहानपणापासूनच लावली पाहिजे. त्यासाठी व्यायाम म्हणजे नेमके काय? हेही समजायला पाहिजे. केवळ थोडेफार चालणे यालाच अनेकजण व्यायाम समजतात. सर्व दृष्टीने फायदेशीर होईल असे व्यायाम शोधून ते चिकाटीने नियमित करणे आवश्यक आहे.  
 
डॉ. चंद्रकांत परमार : पायी चालणे हा अतिशय सुंदर व्यायाम आहे. त्यामुळे तणाव कमी होतो. झोपही चांगली लागते. चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. दिवसभर काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. शिवाय हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते. सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे आपण जवळपास विसरून चाललो आहोत. त्यामुळे थोडे चाललो तरी आपल्याला अनेकदा दम लागतो. असे होत असल्यास हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा आहे, असे समजायचे. 

हेही वाचा - ‘यांना’ सापडला भक्तितून आनंदाचा मार्ग

डॉ. सदाशिवराव कोचारे :  वजन कमी करण्यासाठी फिटनेस वॉकिंग अतिशय फायदेशीर आहे. वजन जास्त आहे आणि चालण्याचा वेगही जास्त आहे, अशा परिस्थितीत स्वाभाविकपणे जास्त कॅलरी खर्च होतात. टेकडी किंवा डोंगरवर चढ उतार केल्यास कॅलरी खर्च होण्याचे प्रमाण वाढते. पण त्याचवेळी आहारावर नियंत्रण हेही महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वेगात चालण्याने पाय, नितंब, पोटाच्या पेशींना ताकद मिळते. त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. 

डॉ. धनंजयराव पाटील : फिटनेस वॉकिंग म्हणजे जोरात पळणे किंवा जॉगिंग नव्हे. फिटनेस वॉकिंगमुळे ह्रदयाची गती वाढते. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. चयापचय संस्था सुधारते. शरीरातील कॅलरी खर्च होतात. शिवाय त्यामुळे कोणताही त्रास होण्याची शक्यता नसते. त्याचप्रमाणे कोणत्याही वयात आपण हा व्यायाम करू शकता. वजन कमी करण्याचा किंवा राखण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आठवड्यातून तीन ते चार वेळा सकाळी वीस ते तीस मिनिटे न थांबता चालल्यास आरोग्यासाठी उत्तम आहे. 

हेही वाचा - ‘हे’ आजोबा ऐंशिव्या वर्षातही ‘फिट’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandedkar crowds over people for 'fitness'