नांदेडकर ‘या’ गोष्टींना वैतागले...

road
road

नांदेड ः नांदेडकर आता गेल्या काही दिवसापासून रस्त्यावरील खड्यांना वैतागले आहेत. खड्ड्यांमुळे लहान - मोठे दररोज अपघात घडत आहेत. त्याचबरोबर अनेक भागात अजूनही नाल्यांची कामे झाली नाहीत. त्यामुळे आता पावसाळा संपला असून तत्काळ रस्त्यावरील खड्डे महापालिकेने बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नांदेडकरांनी केली आहे.

कोणत्याही शहराची ओळख ही त्या ठिकाणी असलेल्या पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधांवरून होत असते. रस्ते आणि नाल्यांची कामे चांगली झाली तर त्याचा चांगला परिणाम दिसून येत असतो. नांदेडला गुरुता गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने २००७ ते २०१० या दरम्यान जवळपास दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली. शहरातील मुख्य ४० रस्ते असून त्याची लांबी जवळपास शंभर किलोमीटरच्या जवळपास आहे. त्याला आता जवळपास दहा ते बारा वर्षे होत आहेत. काही ठिकाणी हे रस्ते खराब झाले असून आता या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याची नियमित देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे.


पालिका हद्दीत 700 किलोमिटरचे रस्ते


शहरात महापालिका हद्दीत एकूण सातशे किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यामध्ये डांबरी, सिमेंट, खडी, पेव्हर आणि कच्च्या रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मिळून एक हजार चारशे किलोमीटर नाल्या होणे अपेक्षित आहे. त्यानुसार आतापर्यंत फक्त २४१.३५ किलोमीटरच्या नाल्या झाल्या आहेत. त्यातील ५७.१० किलोमीटरच्या नाल्या झाकलेल्या आहेत, तर १८४.२५ किलोमीटरच्या नाल्या उघड्या आहेत. अजून ४६७.४५ किलोमीटरच्या नाल्यांचे काम शिल्लक आहे.

नागरिक काय म्हणतात...


शहरातील इतर भागातील अंतर्गत रस्ते आणि नाल्यांची कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण व्हायला हवीत. मात्र, ती अजूनही झाली नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीसह इतर योजनांतून आणि नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीतून रस्त्यांची तसेच नाल्यांची कामे होतात. मात्र, त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे चांगले रस्ते आणि नाल्या होण्यासाठी नियोजन आणि निधीची तरतूद आवश्यक आहे. दर्जेदार आणि टिकणारे रस्ते होण्यासाठी तसेच चांगल्या नाल्या बांधकामासाठी गांभिर्याने काम करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील विविध रस्त्यांची लांबी (किलोमीटरमध्ये)


१) डांबरी रस्ते ः १२२
२) सिमेंट रस्ते ः २२५
३) खडीचे रस्ते ः १४०
४) पेव्हर रस्ते ः सात
५) कच्चे रस्ते ः २०६
एकूण ः सातशे किलोमीटर

शहरातील नाल्यांची लांबी (किलोमीटरमध्ये)
१) डांबरी रस्त्यावरील ः ८८.७५
२) सिमेंट रस्त्यावरील ः १४७.६०
३) पेव्हर रस्त्यावरील ः २.५०
एकूण ः २४१.३५ किलोमीटर

महापालिकेच्या हद्दीतील रस्ते आणि नाल्यांच्या कामांचा आढावा आयुक्त लहुराज माळी यांनी नुकताच घेतला आहे. नांदेड शहरात यंदा सरासरीपेक्षा जास्त तसेच काही वेळा अतिवृष्टीही झाली. त्यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यात बुजवलेले खड्डेही पुन्हा उघडे झाले. आता पावसाळा संपला असून सर्वेक्षण करून टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यात आले आहे. नाल्यांच्या कामासाठीही अमृत योजनेतून जवळपास दोनशे किलोमीटरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ५० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
- गिरीष कदम, कार्यकारी अभियंता, महापालिका.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com