नांदेडची ग्रामदैवत रत्नेश्‍वरी

प्रमोद चौधरी
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नांदेड : ‘‘यादव राजांचे पंतप्रधान हेमाद्रिपंत यांच्या हस्ते माता रत्नेश्‍वरीचे मंदिर बांधकाम आणि मुर्तीची प्रतिस्थापना साधरणतः तेराव्या शतकाचे शेवटचे दशक व चौदाव्या शतकाचे पहिले दशक या दरम्यान झाली आहे’’, अशी माहिती मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाचे सचिव साहेबराव झांबरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

नांदेड : ‘‘यादव राजांचे पंतप्रधान हेमाद्रिपंत यांच्या हस्ते माता रत्नेश्‍वरीचे मंदिर बांधकाम आणि मुर्तीची प्रतिस्थापना साधरणतः तेराव्या शतकाचे शेवटचे दशक व चौदाव्या शतकाचे पहिले दशक या दरम्यान झाली आहे’’, अशी माहिती मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाचे सचिव साहेबराव झांबरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

नांदेड-लोहा मार्गावर लोहा तालुक्‍यात वडेपुरी हे डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. कंधार आणि नांदेड या दोन ऐतिहासिक शहरांपासून जवळच असलेल्या वडेपुरीत रत्नेश्‍वरी देवीचे मंदिर आहे. मराठवाड्याच्या संदर्भात इ. स. ११ ते १४ वे शतक या कालखंडाला सामान्यपणे यादव कालखंड म्हणतात. यादव राजाचा मंत्री हेमाद्री याच्या याच कालखंडात म्हणजे तेराव्या शतकाच्या अखेरीच्या काळात रत्नेश्‍वरीच्या डोंगरावर यादव राजांनी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. नांदेड आणि कंधार येथील किल्लेही भुईकोट आहेत. या दोन्ही किल्ल्यांवर नजर ठेवून राज्य अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने एक डोंगरी किल्ला असावा असा बहुधा विचार करून यादव राजांनी वडेपुरीपासून दोन किलोमीटर लांब असलेल्या या डोंगराची निवड केली.

अशी आहे आख्यायिका 

वडेपुरी गावात नारायण माळी हा शेतकरी व त्याची पत्नी लक्ष्मी दोघेही धार्मिक होते. देवीचे निस्सीम भक्त. माता रत्नेश्‍वरीने याच लक्ष्मी-नारायणाच्या पोटी जन्म घ्यायचे ठरवले. लक्ष्मीला अत्यंत तेजस्वी असे कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नामकरण रत्ना असे करण्यात आले. यथावकाश तिचे शंभुनाथ नावाच्या व्यक्तीसोबत लग्न लागले. लग्नानंतर श्रावणात दर सोमवारी महादेवाची पूजा करण्यासाठी रत्ना बाहेर पडे. एकदा भल्या पहाटे घराबाहेर पडलेल्या रत्नाचा पतीने पाठलाग सुरू केला. एवढ्या अंधारात रत्ना एकटीच घराबाहेर अशी डोंगर-दऱ्यांत जाते याचा अर्थ ती सुंदर रूपातील हडळ आहे, असा समज करून पती शंभुनाथने तिच्यावर तलवारीचा वार करण्यासाठी तलवार बाहेर काढली. रत्नाला हे कळले आणि तिने ‘हे माते मला पोटात घे’ अशी विनवणी केली. शंभुनाथ रत्नाच्या जवळ आला, तिच्या मानेला धरून तिची मान छाटण्याचा पवित्रा त्याने घेतला तेवढ्यात विजेचा एक प्रचंड लोळ खाली आला, त्याचा फक्त स्पर्श रत्नाच्या डोक्‍याला झाला आणि त्याबरोबर रत्नाचे एका शिळेत रूपांतर झाले. पुढे हीच रत्ना रत्नेश्‍वरी देवी म्हणून शिळेच्या रूपात प्रकट झाली, अशी रत्नेश्‍वरी देवीची कथा सांगितली जाते.

हेमाडपंती मंदिर

डोंगरमाथ्यावर रत्नेश्‍वरी विराजमान झालेली आहे. हेमाडपंती पद्धतीने बांधलेले हे मंदिर भाविकांना नेहमीच आकर्षित करून घेते. नवरात्रात येथे मोठा उत्सव साजरा होतो. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जाना आदी जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्रप्रदेशातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक येथे दर्शनाला येत असतात.  नांदेड-लोहा मार्गावर नांदेडपासून साधारण २० किलोमीटरवर डोंगरात रत्नेश्‍वरी देवीचे ठाणे आहे. त्रिशुळ कुंड, महादेव मंदिर आणि अमृत सरोवर यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिराची संपूर्ण देखभाल विश्‍वस्त मंडळाकडून चालत असल्याचे मंडळाचे सचिव साहेबराव झांबरे (९८८१४४४५०९) यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded's Gramdivat Ratneshwari