नांदेडच्या ‘या’ उपक्रमाने रोवला देशपातळीवर झेंडा

Nanded News
Nanded News

नांदेड : कुपोषणाच्या समूळ उच्चाटनाने जिल्ह्यातील बालमृत्यू व गर्भवतीमाता मृत्यूदर रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या दुर्गा बाळ गणेश महोत्सवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी मसुरी येथे सादरीकरण केले. देशभरातून प्रशिक्षणासाठी दाखल झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांसमोर उपयुक्तता व अध्ययनासाठी निवड होऊन नांदेडच्या दुर्गा बाळ गणेश उपक्रमास ‘ए प्लस’ मानांकनाचा दर्जा मिळाल्याने नांदेडच्या उपक्रमाने देशपातळीवर झेंडा रोवला आहे.

गर्भवती महिलांचे हिमोग्लोबीन, वजन कमी असणे हा एक अभिशाप असून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील २७० अंगणवाडीस्तरावर दुर्गा बाळ गणेश महोत्सव राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९० अंगणवाडी पर्यवेक्षिकांमार्फत दोन हजार १९२ गर्भवती महिलांचा उपक्रमामध्ये समावेश करण्यात आला. जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या गर्भवती महिला दररोज दुपारी आपल्या घरून स्वत: जेवणाचा डबा आणून अंगणवाडी केंद्रामध्ये सहभोजन करतात. गावातील इतर मैत्रीणींसोबत गप्पांच्या मैफिलीमध्ये पोटभर जेवणानंतर त्यांना अंगणवाडी केंद्रातच ‘आयएफए’च्या गोळ्या अंगणवाडी सेविका खाऊ घालतात. पोटभर जेवण, नियमीत आरोग्य तपासणी, पचनास उपयुक्त औषधी या शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यामुळे गर्भवती महिलांची अपचनासह आरोग्याच्या समस्या अंगणवाडीस्तरावरच मिटल्याचा सकारात्मक परिणाम झाला.

चर्चेतून समस्यांवर मात
या उपक्रमांमध्ये सहभागी गर्भवती महिलांचे एकही बालक तीन किलो ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे जन्मास आले नाही. काही बालके तर चार किलो ग्रॅमपेक्षाही जास्त वजनाची जन्मास आली आहेत. दरम्यान, दुर्गा बाळ गणेश महोत्सवासाठी निवडण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्रांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी सातत्याने भेटी देऊन थेट गर्भवती महिलांशी संवाद साधला. जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी आपल्या आरोग्याची अशी आस्थेवाइकपणे विचारपूस करत असल्याने गर्भवती महिलांनीही आपल्या अडचणींना वाट मोकळी करुन दिली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागासह आरोग्य विभागाच्या वारंवार बैठका घेऊन गर्भवती महिलांशी चर्चेतून समोर आलेल्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

उपक्रमात सहभाग
दुर्गाबाळ गणेश महोत्सवात उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, महिला बाल विकासचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल शिंगणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांनी सातत्याने अंगणवाडी केंद्रांना भेटी देवून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर बाल विकास प्रकल्प अधिकारी, स्वस्थ भारत प्रेरक, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.

जिल्ह्यात यश

सकारात्मक दृष्टीने आव्हाने पेलल्यास कठीण काम सोपे होऊन जाते, त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनामुळे व यंत्रणेतील विविध सहकाऱ्यांमुळे नाविन्यपूर्ण दुर्गा बाळ गणेश महोत्सव तोही विनाखर्च जिल्ह्यात राबविण्यात यश आले.
- अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी.

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com