दाभोलकर खून प्रकरण; लातूरात ‘अंनिस’तर्फे धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला उद्या (ता. 20) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे मारेकरी अजूनही सापडले नाहीत. तपास यंत्रणांना मास्टर मांईडपर्यंत अद्याप पोचता आले नाही. त्यामुळे लातूरातील अंनिस आणि समविचारी संस्था-संघटनांच्या वतीने गांधी चौकात ‘जवाब दो’ आंदोलन आणि धरणे आंदोलन करण्यात आले.

लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागची पाळमुळं खणून काढा. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सातत्याने रस्त्यावर उतरून तुम्हाला ‘जवाब दो’, असं म्हणत राहू, असा इशारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी सरकारला दिला.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला उद्या (ता. 20) पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे मारेकरी अजूनही सापडले नाहीत. तपास यंत्रणांना मास्टर मांईडपर्यंत अद्याप पोचता आले नाही. त्यामुळे लातूरातील अंनिस आणि समविचारी संस्था-संघटनांच्या वतीने गांधी चौकात ‘जवाब दो’ आंदोलन आणि धरणे आंदोलन करण्यात आले. ‘या गुन्ह्याचा तपास नेमका कधी पूर्ण होणार’, असा जाब सरकारला यावेळी विचारण्यात आला.

ज्येष्ठ समाजवादी नेते मनोहर गोमारे, शहराध्यक्ष वैजनाथ कोरे, कार्याध्यक्ष अनिल दरेकर, बाळ होळीकर, रामराव गवळी, विश्वंभर भोसले, प्रा. माधव गादेकर, संजय व्यवहारे, गणपतराव तेलंगे, डी. एन. भालेराव, सुभाष निंबाळकर, बशीर शेख, शिवाजी सूर्यवंशी, एम. बी. पठाण, सुरेश सलगरे, सुनीता अरळीकर, रामदास पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. निंबाळकर म्हणाले, ‘‘ज्या संघटनेकडून हे कृत्य घडले आहे, ती पुढे आली पाहिजे. तिला शिक्षा झाली पाहिजे. या हत्येमागे राजकीय डावपेजही असू शकतात. याचाही तपास यंत्रणेने विचार करायला हवा.’’

‘‘पाच वर्षापूर्वी डॉ. दाभोलकर यांचा खून करण्यात आला. त्यानंतर तपास यंत्रणेकडून योग्य तो तपास होत नसल्याने अंनिस आणि समविचारी संघटना सातत्याने प्रश्न विचारत आहेत. पण तपासात प्रगती नसल्याचेच दिसून येत आहे. सध्या काही संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मात्र, तेच खरे आरोपी असतील, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे पोलिसांनी सत्य समोर आणले पाहिजे.’’
- मनोहर गोमारे, ज्येष्ठ समाजवादी नेते

Web Title: Narendra Dabholkar Murder Case Agitation Of Anisa In Latur