राष्ट्रगीतातून औरंगाबादच्या वैभवशाली वारशाचे दर्शन 

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : शहराची ओळख जगभर सांगणाऱ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणत औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी राष्ट्रगीतात गुंफले आहे. "अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' या दृक्‍श्राव्य राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता. 14) मान्यवरांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती शनिवारी (ता.९) पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

भारत सरकारने याच वर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेले, "टेम्पल मॅन ऑफ इंडिया' अशी ओळख असलेले भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे माजी संचालक आणि आगाखान सेंटर फॉर कल्चर ऍण्ड हेरिटेजचे विद्यमान प्रकल्प संचालक डॉ. के. के. मुहम्मद यांच्या हस्ते या राष्ट्रगीताचे लोकार्पण होणार आहे. महात्मा गांधी मिशनच्या रुक्‍मिणी सभागृहात गुरुवारी सायंकाळी ठीक पाच वाजता हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहरातील साहित्य, संस्कृती, नृत्य, नाट्य, उद्योग, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा यात समावेश आहे.

याच कार्यक्रमात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडलाचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत बाजपेयी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या बीबी का मकबऱ्यावरील चित्रकथारूप पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. अपर्णा बाजपेयी आणि वर्षा ठाकूर-घुगे यांनी या पुस्तकाचा अनुवादही केला आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारा निधी स्वमग्म मुलांसाठी कार्य करणाऱ्या आरंभ ऑटिझम सेंटरला दिला जाणार आहे. 

'बॅटल ऑफ बटेश्‍वर'ची ऐका कहाणी 
मध्यप्रदेशात चंबळच्या खोऱ्यातील डाकूंच्या इलाख्यात असलेल्या बटेश्‍वर या 200 उद्‌ध्वस्त पुरातन मंदिरांच्या वारसास्थळाचे जतन करताना डॉ. के. के. मुहम्मद यांना अनेकदा प्राणांची बाजी लावावी लागली. डाकूंचे मनःपरिवर्तन करून, त्यांना सोबत घेत वारसा जतनाचे काम करत असताना त्यांना शासकीय पातळीवरही मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, वारशाविषयी असलेल्या प्रेमातून त्यांनी कठिण प्रसंगांना तोंड देत त्या 200 मंदिरांचे जतन आणि संवर्धन कशा प्रकारे केले, याची कहाणी खुद्द त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळणार आहे. इतिहासप्रेमींनी चुकवू नये, असे हे व्याख्यान आहे. 

या कार्यक्रमास शहरातील इतिहासप्रेमी नागरिक, विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे सचिव डॉ. बिना सेंगर आणि त्यांच्या सहकारी व विद्यार्थ्यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने, ऍड. स्वप्नील जोशी, स्वप्नील खरे, अमित देशपांडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com