उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलsakal

Parbhani : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आमूलाग्र बदल ; मंत्री चंद्रकांत पाटील

आदिकाळात भारत देश शिक्षणासाठी प्रसिद्ध होता

परभणी : आदिकाळात भारत देश शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. त्यावेळी जगभरातले विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी यायचे. याउलट आज भारतातले युवक विदेशात जात आहेत. परंतु, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कार्यान्वित झाल्यास शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन जगभरातले विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यास येतील, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्राध्यापकांसाठी मंगळवारी (ता. चार) आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. अर्ध-ऑनलाइन पद्धतीने आयोजित या कार्यशाळेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती.

अर्ध- ऑनलाइन पद्धतीने आयोजित या कार्यशाळेसाठी परभणी जिल्ह्यातील ४६७ प्राध्यापक महाविद्यालयाच्या सभागृहात उपस्थित होते. तर, आभासी रूपाने विद्यापीठ संकुल, हिंगोली, नांदेड तसेच लातूर येथील तीन हजार प्राध्यापक उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यास विविध भाषा, संगीत, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान शाखेचे विविध विषयांचा अभ्यास करता आला पाहिजे, असा उद्देश्य या शैक्षणिक धोरणाचा आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव मिळाला पाहिजे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यात उद्योग व्यवसायासाठी कोणते कौशल्य काळानुरूप आवश्यक आहे, याचा अभ्यास करून अभ्यासक्रम तयार झाले पाहिजेत. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले तर समाज आणि पर्यायाने देशाचा विकास होण्यास मदत होईल. जी महाविद्यालये येणाऱ्या शैक्षणिक धोरणानुसार नवनवीन यशस्वी प्रयोग करतील त्यांना शासनाच्या वतीने अनुदानासह विविध सुविधा पुरवल्या जातील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्राध्यापकांना कोणते कौशल्य आवश्यक आहेत. याबाबतीतही मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्या आहेत. शिक्षक म्हणून संस्था विकासासाठी आपले योगदान आवश्यक राहणार आहे. विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षण देण्यात येणार असल्याने प्राध्यापकांनी यासाठी तयार व्हावे.

- विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग

विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक धोरणाचे स्वरूप आणि उद्दिष्टे पोहचवण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. या धोरणानुसार विद्यार्थी हा बहूवैकल्पिक विषय शिकू शकणार आहे. विज्ञान आणि वाणिज्य सारख्या शाखा स्थानिक भाषेत शिकवल्या जातील. तसेच त्यांचे अभ्यासक्रम आणि साधने ही स्थानिक भाषेत तयार करण्यात येतील. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यापीठ संलग्नता राहणार नाही, अशा परिस्थितीत प्रत्येक महाविद्यालय स्वायत्त होणार आहे.

- डॉ. उद्धवराव भोसले, कुलगुरू,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com