शेतीकामे करून मुली जिंकताहेत मॅरेथॉन!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - दिवसा शेतात पिकांना त्या खत देतात... घरी आईच्या अनुपस्थितीत चूल सांभाळतात अन्‌ नंतर प्रसंगी पालकांचा विरोध पत्करून मैदानावरही येतात... शिक्षक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगावच्या ४५ कन्या आता व्यावसायिक स्पर्धेत उतरू लागल्या आहेत. ग्रामीण भागातून देशी साधनांचा जुगाड करीत या मुली अर्धमॅरेथॉन जिंकत आहेत.

औरंगाबाद - दिवसा शेतात पिकांना त्या खत देतात... घरी आईच्या अनुपस्थितीत चूल सांभाळतात अन्‌ नंतर प्रसंगी पालकांचा विरोध पत्करून मैदानावरही येतात... शिक्षक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळगावच्या ४५ कन्या आता व्यावसायिक स्पर्धेत उतरू लागल्या आहेत. ग्रामीण भागातून देशी साधनांचा जुगाड करीत या मुली अर्धमॅरेथॉन जिंकत आहेत.

घरगुती कामांना फाटा न देता त्यांच्याकडून ५ ते २१ किलोमीटर दौडवण्याचा अवघड वसा सतीश पाटील या क्रीडा शिक्षकाने घेतला आहे. १९९० सालापासून शिक्षकी पेशात असलेले श्री. पाटील यांनी सुरवातीला कबड्डीचे, तर १९९८ नंतर ॲथलेटिक्‍सचे खेळाडू घडविण्याचे काम सुरू केले. एकेकाळी श्री. पाटील यांचे न ऐकणारे जय हिंद विद्यालयाचे माजी विद्यार्थी आज त्यांच्या पाल्यांना मैदानावर त्यांच्याचकडे सरावासाठी पाठवत आहेत. शाळा संपल्यावर सायंकाळी साडेपाचपासून या शाळेचे मैदान सराव करणाऱ्या खेळाडूंनी हाऊसफुल्ल होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वाधिक पदके मिळवून देण्याचा मान मिळविणारी प्राची पाटीलही याच मैदानावरची, हे सतीष पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. नुकत्याच आपल्या खेळाडूंनी पुण्यात लष्कराची अर्धमॅरेथॉनही पटकावली. 

पालकांना हवे प्रोत्साहन 
नवव्या वर्गात शिकणाऱ्या धावपटू मुलीला लग्नासाठी विचारणा होते, ही ग्रामीण भागाची शोकांतिका आहे. लग्न करून जाणारच आहे, कशाला खेळवता असेही पालक बोलतात. ग्रामीणमध्ये मुलांना नाही, तर पालकांनाच प्रोत्साहनाची गरज असल्याचे श्री. पाटील म्हणाले. २००० मध्ये वडिलांच्या नकारानंतर आईला राजी करीत रडत एक मुलगी राज्य मैदानी स्पर्धेत धावली. स्पोर्टस्‌ बूट घालण्याची सवयच नसल्याने तिने चौथे स्थान मिळविले होते. शहरात पालक मैदानावर नेऊन सोडतात, येथे मुले स्पर्धेच्या दिवशीही शेतात राबतात, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

लाकडी भाल्यावर सुवर्णवेध
सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्राची पाटीलने तर लाकडी भाल्यावर सराव केला होता. हा भाला केवळ शंभर रुपयांत तयार झाला होता. साधने आणि सुविधा नसल्याने आहे त्या गोष्टींचा वापर करून ॲथलेटिक्‍सचे इक्विपमेंट तयार करतो. हर्डल (अडथळ्यांची शर्यत) तयार करण्यासाठी प्लॅस्टिक पाईप आणि एल्बोंचा वापर केला आहे. शास्त्रीय साधने गरजेची आहेतच; पण ती नसतील तर ‘जुगाड’ करूनही बक्षिसे जिंकता येतात, असे श्री. पाटील म्हणाले.

मराठवाड्याने ज्योती गवते नावाचे एक रत्न मॅरेथॉनमध्ये घडविले. तिचा विक्रम मोडीत काढणारी मुलगी मला बाभूळगावातून घडवायची आहे. शहरातील शाळांना पैसा मिळतो, गरजवंत तर ग्रामीण शाळा आहेत, आम्ही सत्तर रुपयांत वर्षाचे शिक्षण देतो. आमच्या मुली १० किमी धावून एक तास वेटलिफ्टिंग करतात, या ग्रामीण भागातील क्षमतांचा विचार दात्यांनी करावा. या सगळ्या प्रवासात ‘सकाळ’चे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण आहे. 
- सतीश पाटील, क्रीडा शिक्षक, जयहिंद विद्यालय

Web Title: National Sports Day Agriculture Work Girl Marathon