#NavDurga प्रतिकूल परिस्थितीत साधला ‘नेम’

Harshada-Nithave
Harshada-Nithave

जेमतेम परिस्थिती असलेल्या आईवडिलांची खाणावळ. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ते कामात. क्रीडा क्षेत्रातही करिअर करता येते, याची माहिती त्यांना नव्हती. अशाही प्रतिकूल परिस्थितीत तिने आपली नेमबाजीची आवड नुसती जपलीच नाही; तर त्यात प्रावीण्यही मिळविले. आज ती यशाचे एकेक शिखर पादाक्रांत करीत आहे. आतापर्यंत तिने राज्यासाठी दहा राष्ट्रीय, तर देशासाठी सहा स्पर्धा खेळल्या. ही यशोगाथा आहे हर्षदा निठवे हिची. 

श्री मंतांच्या घरात जन्माला येऊन उत्तम खेळाडू होता येईलच असे नाही; पण जेमतेम परिस्थिती असलेल्या घरात जन्माला येऊन खर्चिक खेळाला हात घालणे आणि त्यात निपुण होणे, हे सर्वांना जमणारे नाही. यातून मोठे होणारे खेळाडू वेगाने पुढे सरकत यश मिळवितात याची साक्ष औरंगाबादकर नेमबाज हर्षदाने आपल्या खेळातून दिली आहे. १४ वर्षे वय असताना एक दिवस ती एमजीएमच्या शूटिंग रेंजवर आली. आपल्या एका नातेवाईक मुलीकडे पाहून तिला प्रेरणा मिळाली; पण नेमबाज होण्यासाठी पुढे काय करायचे हे तिला ठाऊक नव्हते. 

मुलीची आवड लक्षात घेत तिच्या पालकांनी प्रशिक्षक संग्राम देशमुख यांची भेट घेतली. ‘आम्हाला यातलं काही कळत नाही; जे काही आहे ते तुम्ही बघा’ अशी विनंती त्यांनी केली. श्री. देशमुख यांनीही या विनंतीचा मान राखत हर्षदाला शिकवणे सुरू केले. आज हर्षदा पदवीच्या पहिल्या वर्षाला आहे; पण तिचा खेळ दिवसेंदिवस अधिक चमकदार होत आहे. आज तिने राज्यासाठी दहा राष्ट्रीय, तर देशासाठी सहा स्पर्धा खेळल्या. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून तिने जिंकलेली पदके आज निठवे परिवाराचाच नाही; तर संपूर्ण औरंगाबाद शहराचा लौकिक वाढवत आहेत.

खांद्याची दुखापत आणि जिद्द 
वर्ष २०१६ मध्ये हर्षदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तेहरानला गेली होती. सुमारे वर्षभरापासून असलेले खांद्याचे दुखणे याच कालावधीत बळावले. जसपाल राणा यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीने तिच्या खेळण्यास नकार दिला; पण शेवटचा निर्णय तिचाच होता. एवढे लांब आल्यावर माघार न घेता देशासाठी पुढे जाण्याचे तिने ठरवले आणि ती खेळली. यात तिने सांघिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com