#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

अँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची नवदुर्गा आहे राजश्री देशपांडे.

अँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची नवदुर्गा आहे राजश्री देशपांडे.

गुजराती कन्या विद्यालयात शिकणारी राजश्री ही विद्यापीठाचे कर्मचारी बलवंत देशपांडे आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचारी सुनंदा देशपांडे यांची कन्या. आपल्याच शहरात जन्मलेली, शिकलेली ही मुलगी पुण्यात जाऊन वकील होते. जाहिरात एजन्सीत काम करतानाच स्वतःची एजन्सी सुरू करते. त्याचा कंटाळा आला म्हणून थेट मुंबई गाठते. नसिरुद्दीन शाह यांच्या ग्रुपमधून तिचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश होतो. अँग्री इंडियन गॉडेसेस, एस दुर्गा (सेन्सॉर्ड नाव), मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेते. मात्र त्याचवेळी आपल्या गावाशी नाळ तुटू न देता इथल्याच दोन खेड्यांमध्ये जलसंधारण, स्वच्छता आणि शिक्षणासाठी काम करते... हा सगळा प्रवास अद्‌भुत आहे. 

राजश्री कमर्शियल सिनेमा करीत नाही. इंडिपेंडंट आणि दमदार कन्टेन्ट असलेले सिनेमे करते. पण वितरण व्यवस्थेच्या मर्यादांमुळे त्यांना आपल्याकडे थिएटर मिळत नाही, याची तिला खंत वाटते. ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ला २०१५ मध्ये टोरॅंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म ॲवॉर्ड मिळाला. पण हा सिनेमा औरंगाबादमध्ये रिलीजसुद्धा होऊ शकला नाही. ‘सॅक्रीड गेम्स’चा कन्टेन्ट दमदार असला आणि भूमिकाही जबरदस्त असल्या, तरी त्याच्या यशात त्याला मिळालेल्या ‘नेटफ्लिक्‍स’च्या व्यासपीठाचा वाटाही मोठा आहे, असे तिला वाटते. मात्र, तिला स्वतःला भावलेली भूमिका कोणती, असे विचारल्यावर ‘माझ्यासाठी प्रत्येक काम महत्त्वाचं आहे. काही कामे पुढे निघून जातात. काही चांगली कामे मंचाअभावी मागे राहतात,’ असे ती म्हणते.

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बरोबरीने, तेवढ्याच ताकदीचा अभिनय करून स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या राजश्रीला सगळ्याच स्तरांमधून भरपूर चांगले रिव्ह्यूज्‌ मिळत आहेत. ‘मंटो’मधली इस्मत चुगताईची भूमिका करताना मनापासून आनंद वाटल्याचं तिनं सांगितलं. आता ती आदिल हुसेनसोबत नव्या चित्रपटाच्या शूटमध्ये व्यस्त आहे.

दोन गावांच्या उद्घाराचा संकल्प
तीन वर्षांपूर्वी राजश्रीने औरंगाबाद तालुक्‍यातील पांढरी पिंपळगाव दत्तक घेऊन जलसंधारणाच्या कामाला सुरवात केली. पण पावसाचा बेभरवशीपणा पाहता, फक्त पाणी अडविण्याची कामे करून होणार नाही, याची तिला पुरेपूर जाणीव आहे. गावकऱ्यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या जीवनावश्‍यक बाबी सुलभ करण्यासाठी तिने स्वच्छतागृह बांधणीपासून शाळा उभारणीपर्यंत अनेक कामे हाती घेतली. गावाचेही सहकार्य मिळत गेले. तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. राजश्रीने यासाठी चित्रपट क्षेत्रातील मित्रांकडून मदतनिधी उभारला. आता तिच्या नभांगण फाउंडेशनने अंबड तालुक्‍यातील मठजळगाव दत्तक घेतले आहे.

Web Title: NavDurga Success Motivation Rajashri Deshpande