नौदलाच्या तोफांसाठी औरंगाबादेतून मोटर्स

आदित्य वाघमारे
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - रणगाडे आणि बॉंबशोधक यंत्रांच्या मोटर्स तयार करणाऱ्या औरंगाबादच्या प्रांशू इलेक्‍ट्रिकलने बडोद्यातील पॉलीफेज मोटर्स हा उद्योग "टेक ओव्हर' केला आहे. गुजरातेतील यंत्रे औरंगाबादेत आणून ती आता भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या युद्धनौकांसाठी मोटारी तयार करणार आहेत.

औरंगाबाद - रणगाडे आणि बॉंबशोधक यंत्रांच्या मोटर्स तयार करणाऱ्या औरंगाबादच्या प्रांशू इलेक्‍ट्रिकलने बडोद्यातील पॉलीफेज मोटर्स हा उद्योग "टेक ओव्हर' केला आहे. गुजरातेतील यंत्रे औरंगाबादेत आणून ती आता भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या युद्धनौकांसाठी मोटारी तयार करणार आहेत.

1995 पासून मोटार उद्योगात पाय रोवणाऱ्या प्रांशू इलेक्‍ट्रिकलने 2008 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. रणगाड्यांच्या टेरेटला अचूक निशाणा साधण्यासाठी क्षणात फिरविणाऱ्या मोटारी तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. अवाच्या सव्वा किमतीला खरेदी कराव्या लागणाऱ्या रशियन आणि अन्य परदेशी मोटारींना सक्षम आणि स्वस्त पर्याय त्यांनी औरंगाबादेतून उपलब्ध करून दिला. 2008 पासून या उद्योगात असलेल्या प्रांशू इलेक्‍ट्रिकलने आता नौदलासाठी शॉक ग्रेड मोटर्स तयार करणारा बडोद्यातील पॉलीफेज मोटर्स हा उद्योग "ओव्हरटेक' केला. यंत्रणा औरंगाबादेत हलवण्यासाठीची "चेंज ऑफ प्लेस'ची प्रक्रिया सुरू आहे. पॉलीफेजची मालकी "प्रांशू'कडे आल्याने औरंगाबादेतून आता भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या तोफा वेगाने फिरविण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या "शॉकप्रूफ मोटर्स' बनणार आहेत. दुबईस्थित कंपनीसाठी आर्म्ड व्हेईकल माउंटेड गनसाठीची यंत्रणा "प्रांशू'ने घडवली. यंत्रणेला 360 अंशांत फिरवणारी मोटर, गिअरबॉक्‍स, कंट्रोलही औरंगाबादेत तयार झाले. फिरताना वायर गुंडाळली न जाता संपूर्ण यंत्रणा बॅटरीवर चालविण्याचे तंत्रही त्यांनी दिले.

इटालियन कंपनीशी करार
डिफेन्स एक्‍स्पोर्ट, देशांतर्गत पर्यायांवर भर असलेला हा उद्योग आता इटालियन कंपनीशी तांत्रिक करार करेल. डीसी मोटारीसह एसी मोटारी तयार करण्याचे हे काम या माध्यमातून औरंगाबादेत केले जाईल. डीसीला पर्याय म्हणून एसी मोटारला पाहिले जात असून, या मोटारी भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी उपलब्ध होतील.

युद्धनौकांच्या तोफांना वेगवान आणि अचूकता प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या मोटर्स तयार करण्याचे काम "पॉलीफेज'मधून केले जाईल. नवे तंत्रज्ञान देशात येण्यासाठी इटालियन कंपनीशी करारही केला जाणार आहे.
- विवेक हंबर्डे, संचालक, प्रांशू इलेक्‍ट्रिकल, औरंगाबाद

Web Title: navy gun motors