पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यातील चोरीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात, पोलिसांकडून शोध सुरु

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 24 December 2020

परळी वैजनाथ तालुक्यातील पांगरी येथील  पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणात येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

परळी वैजनाथ (जि.बीड) ः परळी वैजनाथ तालुक्यातील पांगरी येथील  पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणात येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस याचा कसून शोध घेत असून बुधवारी (ता.२३) पोलिसाच्या तावडीतून निसटला, मात्र त्याच्या इतर चार सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले चारपैकी तिघे शहरातील व एक लातूरचा असल्याचे समोर आले आहे.वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशाॅप गोदामातून काही दिवसांपूर्वी संगणक संच, माॅनिटर, काॅपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरटयांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे ३७ लाख ९४ हजार ९१४ इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड

 

यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा. परळी) व मुतजीन मुनीर शेख (रा. लातूर) यांना अटक केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हाच नगरसेविकेचा पती आहे. आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी शोध घेताना पोलिसाच्या तावडीतुन तो निसटला. पण त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. पोलिस मंगलदादाच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करू असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Corporator's Husband Behind Stealing In Vaidyanath Sugar Mill Parli Beed News