
लातूर जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी कोरोनाने हाहाकार घातला होता. पण, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे.
लातूर : जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी कोरोनाने हाहाकार घातला होता. पण, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र आहे. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात एक लाख ५४ हजार २५ जणांच्या टेस्ट झाल्या. यात केवळ २३ हजार २६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ६७४ जणांना मात्र कोरोनाचे बळी पडले गेले. उर्वरित रुग्णांनी मात्र कोरोनावर मात केली. जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर ही संख्या हळूहळू वाढत गेली. जूनपर्यंत कोरोना बाधितांची संख्या मर्यादित होती. पण, जूनमध्ये लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच मुंबई, पुणेच्या नागरिकांनी गाव जवळ केले.
त्याचा परिणाम रुग्णांची संख्या वाढण्यात झाला. ऑगस्टमध्ये तर सहा हजारांच्या घरात रुग्ण गेले. त्यानंतर सप्टेंबर महिना तर लातूर जिल्ह्यासाठी धोकादायक ठरला. या महिन्यात नऊ हजार १८८ जणांना कोरोनाची लागण झाली. आक्टोबरपासून मात्र हळूहळू कोरोना बाधितांची संख्या कमी होत गेली आहे. डिसेंबरमध्ये तर केवळ एक हजार १५० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. म्हणजे मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत जिल्ह्यात एक लाख ५४ हजार २५ जणांच्या आरटीपीसीआर आणि ॲंटीजेन टेस्ट झाल्या.
यापैकी २३ हजार २६ जण कोरोना पॉझिटीव्ह आले होते. या पैकी ६७४ जण मात्र कोरोनाचे बळी पडले. इतर रुग्णांनी मात्र कोरोनावर मात मिळवली आहे. गेल्या काही दिवसांत रोज तीस ते चाळीस रुग्ण समोर येत आहेत. शासनाने सांगितलेल्या नियमाचे पालन केले तर ही संख्याही कमी होऊ शकते. कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय योजना अंगीकारण्याचीच गरज आहे.
लातूर जिल्ह्यात मार्च ते डिसेंबर २०२० या दहा महिन्यातील कोरोना रुग्णांची माहिती सांगणारी आकडेवारी
--
महिना---------एकूण टेस्ट---पॉझिटीव्ह संख्या---पॉझिटीव्ह रेट
मार्च--------------६४--------------००----------------------००
एप्रिल-----------३३०-------------१६----------------------४.८
मे--------------१३३९------------११९---------------------८.९
जून-----------२३२८------------२१४-----------------------९.२
जुलै----------१२२१८--------१८५१------------------------१५.१
ऑगस्ट-------३७१९८----------५९११---------------------१५.९
सप्टेंबर--------३९१६७----------९१८८---------------------२३.५
आक्टोबर------१८५५२---------३०२२---------------------१६.३
नोव्हेंबर--------२४१९७----------१५५५--------------------६.४
डिसेंबर--------१८६३२---------११५०-----------------------६.२
Edited - Ganesh Pitekar