औरंगाबादेत इंधन दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे 'कपडे काढो' आंदोलन 

राजेभाऊ मोगल 
सोमवार, 28 मे 2018

जालनारोडवरील एका पेट्रोल पंपावर 'कपडे काढो' आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

औरंगाबाद - देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दररोज वाढ केली जात आहे. महागाई कमी करण्यात हे सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. 28) जालनारोडवरील एका पेट्रोल पंपावर 'कपडे काढो' आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

गेल्या काही दिवसांपासून सतत इंधन दरवाढ होत असल्याने सामान्य माणसाला दुचाकीवरून फिरणे अवघड बनले आहे. याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे, भाऊसाहेब पाटील तरमले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी पेट्रोलपंपावरच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कपडे काढत सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरुद्ध घोषणा देत राग व्यक्‍त केला. या घोषणांनी उपस्थितांचे लक्ष वेधले होते. 

या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मयूर सोनवणे, रहीम पटेल, शेख कयूम शेख, बबलू अंधारे, गणेश औताडे, शरद पवार, अक्षय डक, धनंजय मिसाळ, राम पंडित, सय्यद फैय्याज, अक्षय पुराणिक, अफरोज पटेल, गणेश नवगिरे, गणेश पवार, मधुकर मरकड, राजू शहा, वशीम फारुकी, पंकज चव्हाण, प्रशांत जगताप, अंकुश साबळे, संतोष शेफ, अक्षय शिंदे आदी सहभागी होते. 

हा तर सामान्यांच्या खिशावर डल्ला - 
इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी त्रस्त झाले आहेत. तसेच सार्वजनिक वाहतुकीचे प्रवास दर वाढत असल्याने या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांना याची मोठी छळ सहन करावी लागत आहे. महागाई रोखता येत नसतानाच सामान्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्यांना आगामी काळात जनता माफ करणार नाही. 

- भाऊसाहेब तरमळे, (ग्रामीण जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

Web Title: NCPs movement to protest against the rise in fuel prices in Aurangabad