शेंगा लगडण्याची वेळ, पावसाचा लागेना मेळ 

केदारखेडा (ता. भोकरदन) : गिरिजा-पूर्णा नदीपात्रावरील बंधाऱ्यात साचलेले डबके.
केदारखेडा (ता. भोकरदन) : गिरिजा-पूर्णा नदीपात्रावरील बंधाऱ्यात साचलेले डबके.

जवखेडा (जि. जालना) -  तोंडचा आलेला घास गळून पडावा, अशी स्थिती सध्या सोयबीन पिकाची पावसाविना झालेली आहे. शेंगा लगडण्याची वेळ असताना पावसाचा मेळ लागत नसल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

भोकरदन तालुक्‍यातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. उर्वरित भाग मात्र तहानलेलाच राहिला आहे. जवखेडा, केदारखेडा परिसराला गिरिजा-पूर्णा नदीचे वरदान लाभलेले आहे; मात्र सततच्या दुष्काळामुळे नदीपात्रात पाणी दिसेनासे झाले आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी महिन्यात नदीच्या उगम क्षेत्रात झालेल्या पावसामुळे केदारखेडा येथील नदीपात्रातील बंधाऱ्यात थोडेबहुत पाणी साचले होते; मात्र त्यानंतर जोरदार पाऊसच पडला नाही. केवळ रिमझिम झाली. परिणामी या भागातील नदी-नाले ओसंडून वाहू शकले नाहीत. आता बंधाऱ्यात पाणीही शिल्लक राहिलेले नाही. काही ठिकाणी पाण्याचे डबके तितके दिसत आहेत.

गेल्या उन्हाळ्यात पाण्याविना शेतकरी, पशुपालकांचे मोठे हाल झाले. सध्या तशी स्थिती नसली तरी पाऊस न पडल्यास हिवाळ्यापासूनच दुष्काळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

पिकांचे झाले बेहाल 
परिसरात यंदा रिमझिम पावसावर कसेबसे खरीप पिक उगवले. त्यानंतर अधूनमधून रिमझिम पावसात पिके तगलीही. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. परिणामी पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीनच्या पिकाला आता शेंगा लगडण्याचा कालावधी आहे; मात्र पाऊस नसल्याने पिके माना टाकत आहेत. परिसरातील जोरदार पावसाअभावी नदी-नाले, तलाव, विहिरीही कोरड्या आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देणेही अशक्‍य बनलेले आहे. आर्थिक संकटात असताना शेतकऱ्यांनी खरीप हंगामावर केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. 

शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने घरातील पैसाअडका शेतीमध्ये गुंतविला आहे. सध्या पिके बहरात असली, तरी पाऊस पडत नसल्याने होत्याचे नव्हते होते की काय, अशी भीती वाटते. शेतीवर लावलेला खर्चही अशाने निघणार नाही. 
लक्ष्मणराव ठोंबरे
शेतकरी, जवखेडा 
----- 
केवळ रिमझिम पावसावर कशीबशी पिके तगली; मात्र आता येणारे ढग पावसाविना जात आहेत. कृत्रिम पाऊस तरी आज, उद्या पडेल ही आशा आहे; मात्र वाळत असलेल्या पिकांमुळे आता शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्‍यता कमी दिसत आहे. 
नायबराव घोडसे
शेतकरी, जवखेडा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com