गरजू, अनाथांचा आधार ‘साईप्रसाद’!

प्रमोद चौधरी
बुधवार, 16 जानेवारी 2019

नांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड असलेल्या या संस्थेतर्फे २०१२ पासून शासकीय रुग्णालयात दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचे कन्यादान स्वीकारून त्यांच्या घरासमोरच लग्नही लावून दिले जाते. 

नांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड असलेल्या या संस्थेतर्फे २०१२ पासून शासकीय रुग्णालयात दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचे कन्यादान स्वीकारून त्यांच्या घरासमोरच लग्नही लावून दिले जाते. 

‘साईप्रसाद प्रतिष्ठान’ची ११ जुलै २०१२ ला नांदेडमध्ये स्थापना झाली. आधी बोटावर मोजण्याइतकेच सदस्य होते; परंतु संस्थेचे पारदर्शक कार्य बघून सदस्यसंख्या वाढत गेली. अधिकाऱ्यांपासून मजुरांपर्यंत अनेक जण ‘साईप्रसाद’चे सदस्य आहेत. शिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या देशांतूनही या संस्थेला सदस्य जुळले असून, सदस्यसंख्या अडीच हजार इतकी आहे. 

असे चालते कार्य
‘साईप्रसाद प्रतिष्ठान’ हा बिगर नोंदणीकृत सेवाभावी व्यक्तींचा समूह आहे. निःस्वार्थ सेवा देण्याच्या हेतूने एकत्रित आलेल्या या समूहाला कुणाचाच चेहरा नाही. ‘व्यक्ती मोठी होण्यापेक्षा कार्य मोठे व्हावे,’ या हेतूने सर्व जण कार्य करीत आहेत. समूहातील सदस्यांच्या दातृत्वावरच ‘साईप्रसाद’ची सेवा अखंडित सुरू आहे.

मोफत जेवण व शुद्ध पाणी
विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांना दररोज सकाळी तीनशे आणि सायंकाळी साडेपाचशे जणांना मोफत जेवण दिले जाते; तसेच शुद्ध पाण्यासाठी परिसरात दोन आरओ प्लॅंट बसविले असून, दररोज सहा हजार रुग्ण व नातेवाइकांना बारा हजार लिटर पाण्याचा मोफत पुरवठा केला जातो. 

सामुदायिक विवाह सोहळा
समूहातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, अल्पभूधारक, दिव्यांग, अनाथ, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांतील मुला-मुलींचे मोफत विवाह लावून दिले जातात. त्यांना संसारोपयोगी साहित्य दिले जाते. समूहाने २०१५ मध्ये ५१, २०१६ मध्ये ६३, २०१७ मध्ये ४७, २०१८ मध्ये ६१ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधल्या आहेत. शिवाय छत्र हरपलेल्या सात वधूंचे कन्यादान स्वीकारून त्यांच्या दारात लग्न लावून दिले आहेत. यंदा एप्रिलमध्येही विवाह सोहळा होणार असून, त्यामध्ये ६१ जोडप्यांचा विवाह लावून देण्याचे उद्दिष्ट आहे.

विविध उपक्रम
    दिवाळीत घंटागाडीने कचरा गोळा करणाऱ्या कामगारांचा आहेर
    सीमेवरील सैनिकांच्या गावात जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दीपोत्सव
    आपद्‌ग्रस्तांना संसारोपयोगी साहित्यांसह आर्थिक मदत 
    अनाथ, आत्महत्याग्रस्त कुटुंब, हुतात्म्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्यवाटप
    दर वर्षी पंढरपूर वारीत शुद्ध पाण्याचे वाटप

Web Title: needy Orphaned Support Saiprasad Pratisthan