माजलगावात ग्रामपंचायतीचे वातावरण तापले, चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्याने फाडला

कमलेश जाब्रस
Wednesday, 30 December 2020

वातावरणातील बदलाबरोबर माजलगाव तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीने वातावरण तापले आहे.

माजलगाव (जि.बीड) : वातावरणातील बदलाबरोबर तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीने वातावरण तापले आहे. दिंद्रुड येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.३०) अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या चुलत्याचा अर्ज हातातुन हिसकावुन घेत पळ काढत तहसील कार्यालयाच्या आवारातच अर्ज फाडल्याची घटना घडली आहे.
तालुक्यामध्ये पहिल्या टप्यात पाच ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची तारीख होती. बुधवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आॅनलाईन अर्ज दाखल करत असतांना सर्व्हर डाउन होत असल्याने निवडणूक विभागाने आॅफलाईन अर्ज स्वीकारले या करिता सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ वाढवुन दिला होता.

 

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच उमेदवारांची धावपळ सुरू होती. तहसील कार्यालयाच्या आवारात दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता अशोक हरिनाथ कोमटवार आले असता त्याठिकाणी त्यांचे पुतणे अक्षय दिलीप कोमटवार, अजय दिलीप कोमटवार, अमित दिलीप कोमटवार यांनी अशोक कोमटवार यांना धक्काबुक्की करत हातातील अर्ज हिसकावून घेत त्या ठिकाणाहुन पळ काढत तहसील कार्यालयाबाहेर येउन अशोक कोमटवार व त्यांचा मुलगा निखिल अशोक कोमटवार या दोघांचा उमेदवारी अर्ज फाडला. तहसिल कार्यालयाच्या आवारात यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान अशोक कोमटवार यांच्या कार्यकर्त्यांनी धावाधाव करत कागदपत्रांची जमवाजमव करत अर्ज भरला. शेवटी वेळेत अर्ज दाखल झाला.

 

 

 

 

 
सदरील प्रकार हा तहसिल कार्यालयात झाला नसुन तहसिल कार्यालयाच्या बाहेर झाला आहे.
- वैशाली पाटील, तहसिलदार, माजलगाव.

 

 

पोलिसांकडून दुर्लक्ष
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसिल कार्यालयात पोलिस यंत्रणा कर्तव्यावर होती. परंतु उमेदवारी अर्ज फाडण्याची  घटना घडली असताना मात्र या प्रकाराकडे पोलिसांनी डोळेझाक केली.

 

किती अर्ज?
दिंद्रुड ग्रामपंचायतसाठी १५ जागेकरीता ४४ अर्ज, चोपनवाडी - ७ जागेसाठी ७ अर्ज, नित्रुड - १७ जागेसाठी ५२ अर्ज, मोगरा - १३ जागेसाठी ५६ अर्ज, गंगामसला - ११ जागेसाठी ४४ अर्ज असे ६३ जागेकरीता १८३ अर्ज दाखल झाले आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nephew Teared Grampanchayat Nomination Form Majalgaon Beed News