COVID-19 : बदनापुरात चहा विक्रेत्याला कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोना : कुटुंबातील १२ जणांना केले क्वारंटाइन 

बदनापूर (जि. जालना) : तालुक्यातील आठ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतत नाही, तोच बदनापूर शहरातील कैलासनगर भागात साठवर्षीय चहा विक्रेत्याचा कोरोना तपासणी अहवाल सोमवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या कुटुंबीयातील १२ जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांच्यावर लक्षणानुसार उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, बदनापूर नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून सील केला आहे, तर आरोग्य पथकाकडून कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. 

औरंगाबादसारख्या रेड झोनच्या जवळ असतानादेखील बदनापूर शहर व तालुक्यात सुरवातीचे सव्वादोन महिने एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता; मात्र २८ मे रोजी शहरातील दोन व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी एका रुग्णाच्या कुटुंबातील एक महिला आणि एक मुलगाही तपासणीअंति कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. दरम्यान, योग्य उपचारानंतर चौघेही रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. तर दोनच दिवसांत तालुक्यातील भराडखेडा येथील दोन महिला व दोन मुले असे चौघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्यावरही यशस्वी उपचार झाल्याने चौघेही दोनच दिवसांपूर्वी बरे होऊन परतले होते. त्यामुळे बदनापूर तालुका कोरोनामुक्त झाला, असे वाटत असताना सोमवारी (ता. २९) बदनापूर शहरातील कैलासनगर भागात राहणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

मुंबईतील 'या' भागातील मृत्यूदर जगाच्या दुप्पट तर देशाच्या तीप्पट...

या रुग्णाला न्यूमोनियासदृश लक्षणे आणि खोकला येत असल्यामुळे जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लाळेचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

दरम्यान, या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबीयातील १२ जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून, त्यांच्यावर लक्षणानुसार उपचार आणि तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्रदीप साबळे, उपनगराध्यक्ष शेख युनूस व नगरसेविका मीरा बाबासाहेब कऱ्हाळे यांनी पुढाकार घेत कैलासनगर भागात औषधी फवारणी करण्याच्या सूचना दिल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके आणि तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुदेश वाठोरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, राजेश शर्मा, गणेश ठुबे, रशीद पठाण यांच्यासह पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी कैलासनगर भागाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य पथकामार्फत घरोघरी आरोग्य सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली आहे. बदनापूर नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने हा भाग सील करून कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. 
 

बदनापूर येथे नगरपंचायत प्रशासनाची सतर्कता आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाचा संसर्ग आतापर्यंत आटोक्यात राहिला आहे. यापुढेही नागरिकांनी शासन, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने सुचविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तंतोतंत पालन करून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याचे प्रयत्न करावेत. 
- बाबासाहेब कऱ्हाळे, ग्रामस्थ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A new COVID-19 cases at Badnapur dist Jalna