‘उज्ज्वल नांदेड’ अभ्यासाचा नवा पॅटर्न

FILE PHOTO
FILE PHOTO

नांदेड : पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे अनेकजण आहेत. मात्र, काहीजणांना आर्थिक परिस्थितीमुळे त्या ठिकाणी जाऊन तयारी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा असताना देखील शिक्षण घेता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता दिसून येत नव्हती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी ही बाब ओळखून जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा ग्रंथालय आणि सेतू समितीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका सुरु केली. याद्वारे नियमित मार्गदर्शन, सराव परीक्षा व प्रतिरुप मुलाखती अशा पद्धतीने टप्याटप्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड महापालीका व जिल्हा ग्रंथालय यांच्यामार्फत राबविला जात असून यामुळे शहरासह खेड्यातील होतकरु आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना नवसंजीवनी मिळाली. हा उपक्रम डॉ. परदेशी नांदेडहून गेल्यानंतरही इथे आलेल्या जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांनी सुरुच ठेवला. मध्यंतरी बंद पडण्याच्या मार्गावर असताना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी त्यात विशेष लक्ष दिले. आणि ही प्रथा, परंपरा पुढे चालू ठेवली.

दर महिन्याच्या पाच तारखेला विशेष मार्गदर्शन -
या अभिनव उपक्रमास नुकतीच अकरा वर्ष पूर्ण झाली. श्री. परदेशी यांनी एकाच वेळी तीनशे विद्यार्थी बसतील, अशी मोफत अभ्यासिका तयार केली. त्यासाठी तत्कालीन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांची मोलाची मदत झाली. त्यामुळे अभ्यासिकेकडे तीन पटीने विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना बसण्याची जागा कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चाळणी परीक्षा सुरु करावी लागली. या द्वारे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करुन अभ्यासिकेत प्रवेश दिला जात आहे. या विद्यार्थ्यांना प्रगत आणि अद्ययावत मार्गदर्शन मिळावे, म्हणून राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीकडून दर महिन्याच्या पाच तारखेला विशेष मार्गदर्शन केले जाते.

मुलाखतीवर अधिक भर -
स्वतःला झोकून देऊन सातत्यपूर्ण अभ्यास करणारे मराठवाड्यातील बहुतेक विद्यार्थी पहिली आणि दुसरी परीक्षा यशस्वीरित्या पार पाडतात. परंतु मुलाखतीमध्येच मागे पडतात. तेव्हा या मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच मुलाखतीस कसे सामोरे जायचे, नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक गोष्टीतून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुलाखतीवर आधारीत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन केले जाते. आता हे शिबिर जिल्ह्यातील दोन तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील मुले या शिबिराचा लाभ घेत स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत आहेत.

ही आहे सर्वात मोठी उपलब्धी-
पोलीस उपनिरिक्षक या पदासाठी २०१७ - १८ मध्ये अभिरुप मुलाखत घेण्यात आली होती. यात उज्ज्वल नांदेडच्या ७९ विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली होती. त्यापैकी ३५ विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरिक्षकपदासाठी निवड झाली होती. हे या उज्ज्वल नांदेड पॅटर्नचे सर्वात मोठे यश आहे. या शिवाय एमपीएससी आणि युपीएससी सारख्या खडतर परिक्षेत शेकडो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.



ग्रामिण भागातील विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. ही मुले स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षा आणि दुसऱ्या टप्यातील मुख्य परीक्षा असे दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पाडतात. परंतु तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत यात मात्र मागे पडतात. म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उज्ज्वल नांदेड हा पॅटर्न ग्रामिण भागात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या दोन तालुक्यात हा उपक्रम सुरु आहे.
- आशिष ढोक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com