नव्या प्रभागांमुळे गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

लातूर - महापालिकेच्या मे-२०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी १८ प्रभागांचा प्रारूप रचनेचा आराखडा व आरक्षण निश्‍चिती करण्यात आली. मागील निवडणुकीत ३५ प्रभागांतून ७० सदस्यांची निवड झाली होती. आता १८ प्रभागांतून ७० सदस्य निवडले जाणार आहेत. नव्या प्रभागांमुळे नगरसेवक व इच्छुक कार्यकर्ते गोंधळात पडले असून, आपला परिसर कोणत्या प्रभागात समाविष्ट झाला, संलग्न भाग कोणता, हे शोधण्यातच त्यांचा दिवस निघून गेला. 

लातूर - महापालिकेच्या मे-२०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी १८ प्रभागांचा प्रारूप रचनेचा आराखडा व आरक्षण निश्‍चिती करण्यात आली. मागील निवडणुकीत ३५ प्रभागांतून ७० सदस्यांची निवड झाली होती. आता १८ प्रभागांतून ७० सदस्य निवडले जाणार आहेत. नव्या प्रभागांमुळे नगरसेवक व इच्छुक कार्यकर्ते गोंधळात पडले असून, आपला परिसर कोणत्या प्रभागात समाविष्ट झाला, संलग्न भाग कोणता, हे शोधण्यातच त्यांचा दिवस निघून गेला. 

महापालिकेची निवडणूक मे-२०१७ मध्ये होणार आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यासाठी आयुक्त रमेश पवार यांच्या उपस्थितीत डीपीडीसी सभागृहात गुरुवारी (ता. २२) सकाळी आरक्षण सोडत काढून १८ प्रभागांचा प्रारूप आराखडा घोषित करण्यात आला. पूर्वीच्या ३५ प्रभागांचा समावेश नव्या १८ प्रभागांत झाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग नाहीसे होऊन नवीन भाग जोडला गेला आहे. काही नगरसेवकांना अपेक्षित भाग जोडला गेल्याने हायसे वाटत असून, काहींची अडचण झाली आहे. महापालिकेची निवडणूक आपला ‘वट’ असलेल्या भागावर अवलंबून असते. त्यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक कार्यकर्ते आपल्या  प्रभागाला नेमका कोणता भाग जोडून आला, कोणता भाग तुटला? हे शोधत  होते. आता कोणत्या भागात कोणत्या धर्माची व जातीची मते किती मते असणार? त्या भागात कोणत्या पक्षाचा राजकीय कार्यकर्ता खंबीर आहे, वजनदार व्यक्ती आणि पुढाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. प्रभागाचे आरक्षण व नकाशा पाहून नियोजन लावले जात आहे. नव्या काही प्रभागांत  एकापेक्षा अधिक दावेदार असलेल्या नगरसेवकांत नाराजी आहे. काही नगरसेवकांचे प्रभाग अदृश्‍य झाल्यासारखी स्थिती असून, त्यांचा हक्काचा परिसर दुसऱ्याच कुठल्या तरी प्रभागाला जोडल्याने त्यांची चिडचीड आणि चिंता वाढली आहे. 

हरकतींचा पाऊस पडणार 
निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे प्रशासनाने गोपनीय पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार केल्याचे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात नियमांनुसार गोपनीयता नसल्याचे दिसून आले. १५ दिवसांपासून बहुतांश नगरसेवक त्यांच्या प्रभाग रचनेसंदर्भात दावे करत होते. कोणाचा प्रभाग कोणत्या भागाला जोडला, हे त्यांनी मतदारांना सांगितले. त्यानुसारच प्रभाग रचना अस्तित्वात आल्याचे बुधवारी दिसून आले. परिणामी प्रारूप प्रभाग रचनेवरून हरकती घेणाऱ्यांची संख्या वाढण्याचे संकेत आहेत. 

७० पैकी ३५ जागा महिलांना
शहरातील १८ प्रभागांमधून अनुसूचित जातींसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी एक, इतर मागास प्रवर्गासाठी १९ तर, एकूण ७० पैकी ३५ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.  मे २०१७ मधील निवडणूक नव्या प्रभागरचनेनुसार होणार असून, १८ पैकी एक ते १६ प्रभागांतून प्रत्येकी चार आणि प्रभाग क्र. १७ व १८ मधून प्रत्येकी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. अनुसूचित जातींसाठी १२ (सहा महिलांसाठी राखीव) जागा, अनुसूचित जमातींसाठीची एकमेव जागा महिलांसाठी राखीव, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १९ पैकी दहा जागा महिलांसाठी राखीव असून, सर्वसाधारण गटाच्या ३८ पैकी १८ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. महापालिकेच्या एकूण सदस्यांच्या ७० पैकी ३५ जागा विविध प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. शासनाच्या ता. १३ जूनच्या चक्रानुक्रमे पद्धतीचा आरक्षण निश्‍चितीसाठी आधार घेण्यात आला. चारसदस्यीय प्रभागांची लोकसंख्या सरासरी लोकसंख्या २१ हजार ८८२ तर, तीनसदस्यीय प्रभागांची लोकसंख्या १६ हजार ४१२ आहे.

प्रभागांचा पुढील घटनाक्रम
महापालिकेची प्रारूप प्रभागरचना व आरक्षण ता. २६ डिसेंबरला राजपत्रात प्रसिद्ध होईल. त्यानंतर नागरिकांना हरकती व दावे सादर करता येणार असून, त्यासाठी ता. नऊ जानेवारीपर्यंत मुदत आहे. ता. २५ जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी होईल. पालिकेच्या आयुक्तांकडून शिफारसींसह प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे ता. चार फेब्रुवारी २०१७ पर्यंत हरकती सादर केल्या जातील व ता. १३ फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेईल. त्यानंतर ता. १५ फेब्रुवारीला आयोगाच्या निर्णयानुसार प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल.

लातूर महापालिका  - प्रभागनिहाय आरक्षण

प्रभाग क्र. एक     अ     अनुसूचित जाती महिला    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग     क    सर्वसाधारण महिला     ड    सर्वसाधारण  
प्रभाग क्र. दोन     अ    अनुसूचित जाती महिला     ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग    क    सर्वसाधारण महिला.    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. तीन     अ    अनुसूचित जाती महिला    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    क    सर्वसाधारण    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. चार     अ    अनुसूचित जाती    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. पाच     अ    अनुसूचित जाती    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. सहा     अ    नागरिकांचा मागास प्रवर्ग    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. सात     अ    अनुसूचित जाती महिला    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. आठ     अ    नागरिकांचा मागास प्रवर्ग    ब    सर्वसाधारण महिला    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. नऊ     अ    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    ब    सर्वसाधारण महिला        क    सर्वसाधारण    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. दहा     अ    अनुसूचित जाती महिला    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. ११     अ    अनुसूचित जाती    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. १२     अ    अनुसूचित जाती    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण 
प्रभाग क्र. १३     अ    अनुसूचित जाती महिला    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण 
प्रभाग क्र. १४     अ    अनुसूचित जाती    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग   क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. १५     अ    नागरिकांचा मागास प्रवर्ग    ब    सर्वसाधारण महिला
    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. १६    अ    अनुसूचित जाती    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    क    सर्वसाधारण महिला    ड    सर्वसाधारण
प्रभाग क्र. १७     अ    नागरिकांचा मागास प्रवर्ग    ब    सर्वसाधारण महिला
    क    सर्वसाधारण

प्रभाग क्र. १८     अ    अनुसूचित जमाती महिला    ब    नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    क    सर्वसाधारण
(नोट - प्रभाग क्र. १७ व १८ मध्ये प्रत्येकी तीन सदस्यसंख्या आहे)

Web Title: new ward structure confussion