औरंगाबादमध्ये इंदूरच्या धर्तीवर नवी पाणीयोजना

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 1,680 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1,308 कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, ही योजना इंदूर शहराच्या धर्तीवर राबविली जाण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच इंदूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहराच्या जुन्या दोन्ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्या आहेत. त्यात समांतर पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन शक्‍य नसल्याचे समोर येताच राज्य सरकारने शहरासाठी 1,680 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याच्या कामाची 1,308 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. निविदा स्वीकारण्याची अंतिम तारीख आठ नोव्हेंबर असून, नऊ नोव्हेंबरला निविदा उघडली जाईल. त्यानुसार जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनी इंदूर येथील पाणीपुरवठा योजनेची माहिती घेण्यासाठी नुकताच दोन दिवसांचा दौरा केला. 
 
सर्वांत मोठी योजना 
जीवन प्राधिकरणाने राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांचे काम केले असले, तरी 1,680 कोटींची आतापर्यंतची सर्वांत मोठी योजना आहे. त्यामुळे योजनेचे काम करताना बारकावे तपासले जात आहेत. इंदूर शहरात नव्याने राबविण्यात आलेल्या योजनेचा जीवन प्राधिकरणाला फायदा होणार आहे. 
 
महापालिका अनभिज्ञ 
शहरासाठी योजना राबविण्यात येत असली, तरी अद्याप महापालिका व जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची एकही बैठक घेण्यात आलेली नाही. शासनाने दिलेल्या आदेशात समन्वयक अधिकारी नियुक्त करण्याचे नमूद करण्यात आले आहे; मात्र अद्याप अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील झालेली नाही. जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडून जुन्या योजनांची माहितीही घेतलेली नाही, असे सूत्राने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com