नवलच...लाभार्थींऐवजी चप्पल, बुट पाळताहेत सामाजिक अंतर ...कुठे वाचा

रघुनाथ मुलगीर
Saturday, 25 April 2020

पोतरा येथील जिल्‍हा मध्यवर्ती बँकेत आलेल्या ग्राहकांसाठी बँकेसमोर आखलेल्या गोल रिंगणात चक्‍क बुट, चप्पल ठेवून ग्राहकांनी त्‍याचा रांगा लावल्या आहेत. चप्पल, बुट रांगेत ठेवून ग्राहक मात्र इतरत्र सावलीत बसून गप्पा मारत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पोतरा (जि. हिंगोली): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. बँक प्रशासनाला देखील अनेक नियम व अटी घालुन दिल्या आहेत. त्‍याप्रमाणे बँकेचे कामकाज सुरू आहे. शनिवारी (ता.२५) येथील जिल्‍हा मध्यवर्ती बँकेत आलेल्या ग्राहकांनी बँकेसमोर आखलेल्या गोल रिंगणात चक्‍क बुट, चप्पल ठेवून त्‍याचा रांगा लावल्या. त्यानंतर इतरत्र सावलीत बसून गप्पा सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे सोशल डिस्टन्स माणसांसाठी आहे की, चप्पल, बुट यांच्यासाठी ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

पोतरा (ता. कळमनुरी) येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला वीस गावे जोडली आहेत. यात कवडा, निमटोक, टव्हा, तेलंगवाडी, सिंदगी, असोला, येहळेगाव गवळी, बोल्‍डा, बोल्‍डावाडी, गोरलेगाव, पोतरा आदी गावांचा समावेश आहे. 

हेही वाचा -हिंगोलीत गरजूंसाठी मदतीचा ओघ सुरूच

सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन

बॅंकेत सध्या पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थीच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत. तसेच पीक विम्याची रक्‍कम व जनधन खात्याचे पाचशे रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे ही रक्कम उचलण्यासाठी लाभार्थी, बॅंक ग्राहक गर्दी करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना

 तसेच बँक प्रशासनालाही अटी व नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सामाजिक अंतर पाळण्यासाठी बॅंकेसमोर गोल वर्तुळ आखण्यात आली आहेत. या वर्तुळात उभे टाकण्याचे आवाहन बॅंकेने लाभार्थी, ग्राहकांना केल आहे. 

उन्हाचा पारा वाढतोय

सध्या लाभार्थी बॅंकेत येत आहेत. एकाच वेळी लाभार्थी बॅंकेत गर्दी करीत असल्याने पैसे उचलण्यासाठी बराच वेळ लागत आहे. तासनतास बॅकेबाहेर आखलेल्या वर्तुळात उभे राहावे लागत आहे. मात्र, उन्हाचा पारा वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे लाभार्थी आपला नंबर येईपर्यंत बॅंकेने आखलेल्या वर्तुळात चप्पल, बुट ठेवून परिसरातील सावलीत थांबत आहेत. 

येथे क्लिक करा - मॉर्निंग वाक करणारे पोलिसांच्या जाळ्यात...कुठे वााचा

सामाजिक अंतराचा फज्जा

बॅंकेसमोर केवळ चपला व बुट रांगेत थांबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाभार्थीएवजी चपल, बुट सामाजिक अंतर पाळत असल्याचे चित्र पोतरा येथे पहावयास मिळत आहे. दरम्यान, बॅंक प्रशासनाने बॅंकेच्या  आवारात सावलीसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लाभार्थींमधून होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newly ... instead of beneficiaries, slippers and shoes are keeping social distance ... read where Hingoli news