ट्रकवर दुचाकी आदळून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

तुरोरी (जि. उस्मानाबाद) : ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रामपूर पाटीजवळ (ता. उमरगा) बुधवारी (ता. 23) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

तुरोरी येथील विष्णू बाबूराव बिराजदार (वय 42) हे उस्मानाबाद पोलिस दलात गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत होते. सध्या ते कदेर (ता. उमरगा) येथे वास्तव्यास होते. बुधवारी सकाळी लोहारा पोलिस ठाण्याकडे ते दुचाकीने निघाले होते.

राष्ट्रीय महामार्गावरील रामपूर पाटीजवळ ट्रकवर दुचाकी पाठीमागून जोरात धडकल्याने विष्णू बिराजदार यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, दोन भावंडे व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तुरोरी येथे शासकीय इतमामात विष्णू बिराजदार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about accident