एटीएम केंद्रावर पुन्हा खडखडाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

शहरातील अनेक एटीएम केंद्रांवर बुधवारी (ता. 14) खडखडाट असल्याचे चित्र पुन्हा दिसून आले. रक्कम मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करीत पैसे असणाऱ्या केंद्राचा शोध घ्यावा लागला. तर काही केंद्र अनेक दिवसांपासून बंदच असल्याने शहरातील एटीएम सेंटर शोभेच्या वस्तू बनल्या आहेत का, असा प्रश्‍न ग्राहकांतून विचारला जात आहे.

उस्मानाबाद ः शहरातील अनेक एटीएम केंद्रांवर बुधवारी (ता. 14) खडखडाट असल्याचे चित्र पुन्हा दिसून आले. रक्कम मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करीत पैसे असणाऱ्या केंद्राचा शोध घ्यावा लागला. तर काही केंद्र अनेक दिवसांपासून बंदच असल्याने शहरातील एटीएम सेंटर शोभेच्या वस्तू बनल्या आहेत का, असा प्रश्‍न ग्राहकांतून विचारला जात आहे.

 
दुसरा शनिवार (ता. 10) असल्याने सुटी होती. पुन्हा रविवारची (ता. 11) साप्ताहिक सुटी, तर सोमवारी (ता. 12) बकरी ईद असल्याने शहरातील एटीएम सेंटरवर खडखडाट होता. मंगळवारी (ता. 13) शहरातील एटीएममध्ये पैसे भरले जातील, अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र काही तुरळक सेंटरवरच मंगळवारी दुपारनंतर पैसे उपलब्ध झाले. रात्री पुन्हा शहरातील बहुतांश एटीएम सेंटरवर खडखडाट पाहायला मिळाला. बुधवारी (ता. 14) पुन्हा तशीच स्थिती होती. युनियन बॅंकेचे एटीएम सेंटर वगळता शहरातील सर्वच केंद्रांवर पैसे नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ सुरू होती. त्यात गुरुवारी (ता.15) स्वातंत्र्यदिनाची सुटी आहे. त्यामुळे शहरातील एटीएम सेंटरवर पैसे भरले जाणार नाहीत. परिणामी स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याने नागरिकांना पुन्हा एटीएम सेंटरवर पैशाची शोधाशोध करावी लागणार आहे. 

बॅंकेकडे विचारणा 
एटीएम सेंटरवर पैसे नसल्याने अनेक नागरिक बॅंकेकडे विचारणा करीत आहेत. मात्र सेंटरचा आणि आमचा काही संबंध नसल्याचे ग्राहकांना सांगितले जाते. त्यामुळे एटीएम सेंटर नेमके कोणाच्या अखत्यारीत येतात, असा प्रश्‍न ग्राहकांतून विचारला जात आहे. विशेष म्हणजे सेंटरवरील पैशाचा खडखडाट वारंवार असूनही त्यावर कारवाई होत नाही. शिवाय काही सेंटर महिनोन्‌महिने बंद असतात. तरीही त्यांच्याबाबत येथील लीड बॅंकेचे अधिकारी मूग गिळून गप्प राहतात. दरम्यान, याबाबत कोठे दाद मागायची, याचीच माहिती नसल्याचे ग्राहक सांगत आहेत. 

एटीएम सेंटरवर पैसे नसल्याने अनेक ग्राहक पैशासाठी बॅंकेत जातात. मात्र त्यांना पासबुकची सक्ती केली जाते. पासबुक घेऊन रांगेत थांबायचे म्हटले की, अधिकाऱ्यांच्या कामांची कासवगती आड येते. अर्धा दिवस रांगेत थांबल्यानंतर पैसे मिळतात. त्यामुळे अत्याधुनिक सुविधा असल्या तरी केवळ पैसे काढण्यासाठी अर्धा दिवस घालवावा लागत असल्याने हे ग्राहकांचेच दुर्दैव असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about ATM