औरंगाबादचे औद्योगिक बळ येणार एकत्र! 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - जगातील सुमारे सत्तर देशांमध्ये आपल्या औद्योगिक ताकदीवर डंका वाजवणाऱ्या औरंगाबादेतील सर्वच क्षेत्रांतील कंपन्या आता एकाच छताखाली येणार आहेत. मराठवाडा ऑटो क्‍लस्टरच्या विस्तीर्ण परिसरात तयार होणाऱ्या "पर्मनन्ट प्रॉडक्‍ट डिस्प्ले सेंटर' मध्ये येणाऱ्या देशी-परदेशी औद्योगिक ग्राहकांना औरंगाबादेतील कार्यरत सगळी बलस्थाने अवघ्या अडीच तासांत समजून घेता येणार आहेत. 

देशातील आपल्या पद्धतीचे पहिलेच असे हे डिस्प्ले सेंटर मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये अस्तित्वात येत असून त्यामध्ये ऑटोमोबाईल, औषधी, हेवी इंजिनिअरिंग, ऑटोमेशन, कॅपिटल गुड्‌स आदी विषयांमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनाची माहिती आता एकाच छताखाली स्टॉलद्वारे तयार मिळणार आहेत. प्राथमिक माहितीसाठी आता शेंद्रा, वाळूज, औरंगाबाद आणि चिकलठाणा येथे असलेल्या कंपन्यांपर्यंत प्रवास करायला जाण्याची गरज राहणार नसल्याचा दावा ऑटो क्‍लस्टरचे चेअरमन उमेश दाशरथी यांनी केला आहे. 
 
माहिती देण्याची अत्याधुनिक पद्धत 
प्रत्येक कंपनीची माहिती आणि ब्रोशर एकाच की-ऑस्कमध्ये अपलोड करण्यात आले आहेत. त्या कंपनीचे ब्रोशर आपल्या ई-मेलवर घेण्याची थेट सोय या की-ऑस्कमध्ये आहे. ग्राहकाने आपला ई-मेल ऍड्रेस टाकताच, संबंधित कंपनीला त्या ग्राहकाचा ई-मेल जाणार असल्याने कंपनीला ग्राहकाला प्रत्यक्षात भेटण्याची गरज सुरवातीला राहणार नाही. नोंदणी झाल्यावर त्याची माहितीही सगळ्या कंपन्यांना प्राप्त करून घेता येणार असल्याने आलेल्या ग्राहकांशी कनेक्‍ट होण्याची संधी या कंपन्यांना मिळणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक जयंत पाडळकर यांनी दिली. 
  
ऐतिहासिक पार्श्‍वभूमी सांगणारी क्‍लिप 
साडेचार हजारांपेक्षा अधिक कंपन्यांनी समृद्ध औरंगाबादचे औद्योगिक क्षेत्र हा काळाच्या ओघात आलेला वारसा आहे. दगडांपासून शस्त्र तयार करण्याचा कारखाना, रेशीम मार्गावर देशातील अव्व्ल नऊ व्यापारी शहरांपैकी मराठवाड्यातील तीन शहरे, त्यांच्यातून चालणारा व्यापार आदी विषयांची माहिती क्‍लिपद्वारे देण्यात आली आहे. जगात आज संशोधन सुरू असलेल्या रिव्हर्स इंजिनिअरिंगसह मराठवाड्यात ऐतिहासिक वास्तू उभ्या राहिल्याचा दाखलाही या क्‍लिपमध्ये आहे. विशेष म्हणजे, येथील प्रत्येक बाब ही "मेड इन मराठवाडा' आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com