दक्षिण मध्य रेल्वेची औरंगाबादला सापत्न वागणूक

अनिल जमधडे
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

 • उत्पन्नात अव्वल असून, नवीन रेल्वे नाही 
 • पीटलाइन नाही, डबलिंगचे भिजत घोंगडे 
 • विद्युतीकरणाचेही काम सुरू होईना 

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्वाधिक उत्पन्नात टॉप ट्‌वेंटीमध्ये असतानाही औरंगाबाद रेल्वेस्थानकाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. क्षुल्लक उत्पन्न मिळवणाऱ्या रेल्वेस्थानकांना भरभरून सोयीसुविधा देताना, औरंगाबादसाठी एकही नवीन रेल्वे सुरू केली जात नाही. मुंबईसाठी सातत्याने मागणी करूनही रेल्वे सुरू केली जात नाही. 

औरंगाबाद रेल्वेस्थानकाने दक्षिण-मध्य रेल्वेच्या टॉप ट्‌वेंटीत आपले स्थान मिळवत, वर्षभरात 73 कोटी, तर गेल्या चार महिन्यांत 25 कोटी रुपयांची कमाई औरंगाबाद रेल्वेस्थानकाने केली आहे. नवीन रेल्वेगाड्या सुरू होत नसल्याने या भागातील प्रवासीवर्ग त्रस्त झालेला आहे. सातत्याने मागणी करूनही नवीन रेल्वे सुरू केली जात नाही. नवीन पीटलाइनचा प्रस्तावही गुंडाळून ठेवण्यात आलेला आहे. सध्या मुंबई जाण्यासाठी सिकंदराबाद- मुंबई (देवगिरी), नागपूर- मुंबई (नंदीग्राम), नांदेड- मुंबई (तपोवन), जालना-दादर (जनशताब्दी) अशा चार गाड्यांवर येथील प्रवाशांचा भार आहे. मुंबईला जाण्यासाठी कायम रिझर्वेशन फुल्लचा सामना करावा लागतो, अनेक वेळा मोठा आर्थिक फटका सहन करून खासगी बसचा आधार घ्यावा लागतो. मुंबईसाठी नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी नवीन गाडी शक्‍य नाही; मात्र मनमाडपर्यंत येणारी राज्यराणी एक्‍स्प्रेस औरंगाबादपर्यंत आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र दीड वर्ष उलटूनही याबाबत काहीही निर्णय घेतला नाही किंवा नवीन रेल्वेगाडीही सुरू केली नाही. 
  
पीटलाइनचा प्रश्‍न गुंडाळला 
दक्षिण मध्य रेल्वेच्या संपूर्ण विभागात पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे नव्याने गाड्या सुरू करणे आवश्‍यक आहे; मात्र कायम रेल्वेची दुरुस्ती व स्वच्छता यंत्रणा (पीटलाइन) नाही. म्हणून नवीन रेल्वे सोडण्यात अडचण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच चिकलठाणा येथे पीटलाइन करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे अकरा कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यासाठी महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी सप्टेंबर 2017 मध्ये चिकलठाणा रेल्वेस्थानकाची पाहणीही केली होती. त्यामुळे चिकलठाणा येथे नवीन पीटलाइन होईल अशा अपेक्षा असतानाच या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने जागा कमी असल्याचे कारण दाखवून केराची टोपली दाखवली. प्रत्यक्षात कमी उत्पन्न असणाऱ्या अनेक रेल्वेस्थानकांमध्ये पीटलाइन असताना, अधिक उत्पन्न असणाऱ्या औरंगाबादच्या पीटलाइनला गुंडाळून ठेवण्यात आले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शिर्डीमध्ये येत असतात, म्हणूनच रोटेगाव ते पुणतांबा या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी आहे. मध्यंतरी रेल्वे बोर्डाने रोटेगाव पुणतांबा या जुन्या प्रस्तावित मार्गाऐवजी रोटेगाव-कोपरगाव कॉडलाइनचा प्रस्तावाचा विचार केला होता. प्रत्यक्षात यावरही काहीही निर्णय झालेला नाही. 
 
रखडलेल्या मागण्या 

 • पर्यटनाच्या विकासासाठी विशेष रेल्वे सुरू कराव्यात. 
 • रोटेगाव ते कोपरगाव नवीन रेल्वेमार्गासाठी निधी द्यावा. 
 • औरंगाबाद-दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव हा 88 किमीचा मार्ग पूर्ण करावा. 
 • मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर या नवा मार्गही लवकर पूर्ण करावा. 
 • औरंगाबादेत पीटलाइनचे काम पूर्ण करावे. 
 • औरंगाबाद ते नागपूर एक्‍स्प्रेस सुरू करावी. 
 • नांदेड-मुंबई नवीन रेल्वे सुरू करावी. 
 • औरंगाबाद- मुंबई रेल्वेगाडी सुरू करावी. 
 • राज्यराणी एक्‍स्प्रेस औरंगाबादपासून सुरू करावी. 
 • मनमाड-मुदखेड डबलिंगचे काम पूर्ण करावे. 
 • विद्युतीकरणाचे काम हाती घ्यावे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Aurangabad Railway