मुंडेंच्या स्मारकासाठी 50 कोटी, बाळासाहेबांचे करा 10 कोटींत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन व स्मारक विकसित करण्यासाठी महापालिकेमार्फत 64 कोटी 40 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती; मात्र युती शासनानेच महापालिकेला पत्र देऊन हे स्मारक 10 कोटी रुपयांमध्येच करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी शासनाने नुकतीच 50 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. शासनाच्या आदेशामुळे महापालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी अचंबित झाले आहेत. 

औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन व स्मारक विकसित करण्यासाठी महापालिकेमार्फत 64 कोटी 40 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती; मात्र युती शासनानेच महापालिकेला पत्र देऊन हे स्मारक 10 कोटी रुपयांमध्येच करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी शासनाने नुकतीच 50 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. शासनाच्या आदेशामुळे महापालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी अचंबित झाले आहेत. 

सिडको भागातील एमजीएम परिसरात असलेल्या प्रियदर्शिनी उद्यानातील सात हेक्‍टर जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतिवन विकसित करणे व स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीतर्फे पाच कोटींचा निधीही दिला. स्मारकाची रूपरेषा ठरविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातले. दरम्यान, महापालिकेने 64 कोटी 40 लाख रुपयांची निविदाही प्रसिद्ध केली. पहिल्या दोनवेळा निविदेला प्रतिसाद मिळाला नाही; मात्र तिसऱ्यावेळी दिल्ली, नोएडा येथील कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला.

ही निविदा सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव महापौरांनी राज्य शासनाला दिला. त्यावर कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांनी एक ऑगस्टला महापालिकेला पत्र पाठविले असून, त्यात 2016 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचा हवाला देत स्मारकाचा प्रस्ताव 10 कोटींच्या मर्यादेत करण्यात यावा. सुधारित प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मान्यतेने सादर करावा, अशा सूचना महापालिकेला केल्या आहेत. 
 
64 कोटींची निविदा अंतिम करा 
यासंदर्भात विचारणा केली असता, महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे शासनाकडून शंभर टक्के निधी मिळेलच. कक्ष अधिकाऱ्यांचा काही तरी गैरसमज झालेला दिसतोय. पालकमंत्र्यांना सोबत घेऊन लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल. दरम्यान, 64 कोटींची निविदा प्रक्रिया सुरूच ठेवावी, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Balasaheb Thackeray and Gopinath Munde Memorial