
अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपकडून सिल्लोडची जागा कोणत्या मतदारसंघाच्या बदल्यात सोडली जाणार यांची चर्चा सुरू होती. गंगापूर की औरंगाबाद मध्य अशा दोन्ही जागांची चर्चा सुरू होती. युतीमध्ये विद्यमान आमदारांचे मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते.
औरंगाबाद : भाजप-शिवसेना युती जाहीर झाली आहे. युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना बी फॉर्म दिले. त्यात युतीत सिल्लोडच्या भाजपच्या वाट्याला असलेल्या जागेवर शिवसेनेत प्रवेश केलेल्या अब्दुल सत्तार यांना बी फॉर्म देण्यात आला. या जागेच्या बदल्यात शिवसेनेने गंगापूरची जागा भाजपला सोडली. तेथून मंगळवारी (ता.एक) विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपकडून सिल्लोडची जागा कोणत्या मतदारसंघाच्या बदल्यात सोडली जाणार यांची चर्चा सुरू होती. गंगापूर की औरंगाबाद मध्य अशा दोन्ही जागांची चर्चा सुरू होती. युतीमध्ये विद्यमान आमदारांचे मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. शिवसेनेकडे असलेला गंगापूर-खुलताबाद मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. प्रशांत बंब हे दोन टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे ही जागा भाजपकडे ठेवून सिल्लोड-सोयगावची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली आहे.
प्रशांत बंब यांचा मार्ग मोकळा
गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून वर्ष 2009 मध्ये आमदार प्रशांत बंब अपक्ष म्हणून निवडून आले होते. तेव्हा बंब यांनी शिवसेनेच्या अण्णासाहेब माने यांचा पराभव केला होता, तर वर्ष 2014 मध्ये युती तुटल्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा पराभव करत बंब भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. सलग दोन निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेना पराभूत झालेली आहे. आता शिवसेनेलाही युती धर्म पाळत प्रशांत बंब यांच्यासाठी काम करावे लागणार आहे.
सिल्लोडला भाजप कार्यकर्त्यांची नाराजी
सिल्लोडचा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. गेल्या दशकभरापासून या मतदारसंघावर कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व राहिले आहे. वर्ष 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपतर्फे सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तार यांच्यात थेट लढत झाली होती. यानंतर आताही पाच ते सहा इच्छुकांनी मतदारसंघातून तयारी केली होती. मात्र, ही जागा शिवसेनच्या वाट्याला गेल्यामुळे आता इच्छुकांमध्ये नाराजी आहे. एवढेच नाही तर काहींनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांची ही नाराजी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. कारण सत्तारांना विरोध करणारा मोठा गट तालुक्यात कार्यरत आहे. तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी कोणाला साथ देतात हेच पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.