हाती टॅब आले, मनुष्यबळाअभावी वांधे झाले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

पशुगणनेचे काम लवकर व्हावे यासाठी यावर्षी पशुप्रगणकांच्या हाती टॅब दिले आहेत. पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. यामुळे पशुगणनेच्या कामाचे वांधे झाले आहेत. 

औरंगाबाद - पशुगणनेचे काम लवकर व्हावे यासाठी यावर्षी पशुप्रगणकांच्या हाती टॅब दिले आहेत. पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. यामुळे पशुगणनेच्या कामाचे वांधे झाले आहेत. 

या महिनाअखेरपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र आतापर्यंत फक्‍त व्हिलेज मॅपिंगचे शंभर टक्‍के काम झाले असले तरी प्रत्यक्षात पशुधनाची कोणत्या भागात काय परिस्थिती आहे, त्यांची संख्या किती आहे, त्यात दूध देणारी आणि येणाऱ्या पाच वर्षांत दुग्धोत्पादनासाठी सक्षम किती, भाकड किती आहेत, त्यांच्यावर काय उपचार करावे लागणार आहेत, त्यांचे लसीकरण करण्यासाठी किती लसमात्रांची गरज आहे, निधीची किती आवश्‍यकता आहे, एखाद्या जातीच्या गायी किंवा म्हशी कमी होत आहेत का, जर त्या नामशेष होण्याच्या मार्गावर असतील तर त्यासाठी कोणत्या योजना राबवाव्या लागतील या सर्व बाबींचे नियोजन पशुधनाच्या संख्येवर अवलंबून असते. पशुधनाची संख्या उपलब्ध असेल तर त्यादृष्टीने सर्व नियोजन करता येते. यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. केंद्र सरकारकडून राज्यांना कार्यक्रम आखून दिला जातो. त्यानुसार राज्याच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात पशुगणनेचा कार्यक्रम राबविण्यात येतो. यापूर्वीची 19 वी पशुगणना 2012 मध्ये झाली होती. यानंतर ती 2017 मध्ये होणे अपेक्षित होते.

आधीच एक वर्ष उशिराने पशुगणना सुरू झाली आहे; मात्र सद्यःस्थितीत सुरू असलेली 20 वी पशुगणना कासवगतीने सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पशुगणनेसाठी जिल्ह्यात 212 प्रगणक आणि 47 पर्यवेक्षक हे काम करीत आहेत; तथापि गेल्या डिसेंबरमध्ये 193 टॅब प्रगणकांना देण्यात आलेले आहेत. डिसेंबरपासून पशुगणननेला सुरवात झाली असून, 31 मार्चपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे; तथापि आतापर्यंत ज्या गावांमध्ये पशुगणना करायची आहे त्या गावांचे व्हिलेज मॅपिंग व सर्व्हरशी कनेक्‍ट करण्याचे शंभर टक्‍के काम झाले असले तरी पशुगणनेचे काम फक्‍त 30 टक्‍के झाल्यात जमा आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने पशुगणनेला उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: News about cattle census