वडिलानेच केला मुलाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

अनैतिक संबंधाच्या संशयावरून बापानेच स्वतःच्या मुलाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना जवळा (खुर्द, ता. कळंब) येथे घडली.

शिराढोण (जि. उस्मानाबाद) ः अनैतिक संबंधाच्या संशयावरून बापानेच स्वतःच्या मुलाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना जवळा (खुर्द, ता. कळंब) येथे घडली. याप्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. पाच) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पावसात पाठलाग करीत संशयित आरोपी शहाजी रामा कांबळे यास अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा (खुर्द) येथील माजी पोलिस पाटील शहाजी रामा कांबळे (वय 65) याने मुलगा सुनील कांबळे (वय 35) याच्यावर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत शुक्रवारी (ता. चार) सायंकाळी घरात चाकूने वार केला. सुनील पाणी पीत असताना त्याने सून व पत्नीसमोर मुलावर चाकूने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनील कांबळे यास नातेवाइकांनी उपचारासाठी तत्काळ कळंबच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी सुनील कांबळे याला मृत घोषित केले. याप्रकरणी सुनीलची पत्नी रेश्‍मा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी शहाजी कांबळे फरारी होण्याच्या प्रयत्नात असताना सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, मुख्य अंमलदार ज्ञानेश्वर पोफलायत यांच्यासह पोलिस कर्मचारी शिवाजी गवळी, बाबासाहेब मोराळे, लक्ष्मण सगर यांनी शनिवारी (ता. पाच) पहाटे तीन वाजता पावसात पाठलाग करून अटक केली. दरम्यान, कळंब न्यायालयाने शहाजी कांबळे याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about crime