औरंगाबाद : कुत्रे पकडणाऱ्यालाच चावा, हाताचा तोडला लचका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने नव्या एजन्सीची नियुक्ती केली आहे. एजन्सीने काही दिवसांपासून काम सुरू केले असून, शुक्रवारी (ता. 16) एका कर्मचाऱ्यालाच मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना पदमपुरा भागात घडली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

औरंगाबाद -  शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने नव्या एजन्सीची नियुक्ती केली आहे. एजन्सीने काही दिवसांपासून काम सुरू केले असून, शुक्रवारी (ता. 16) एका कर्मचाऱ्यालाच मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना पदमपुरा भागात घडली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न गेल्या काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. कुत्र्यांची संख्या 40 ते 45 हजारांच्या घरात गेली असून, हे कुत्रे नागरिकांवर हल्ले करीत आहेत. वृद्ध, बालकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेने गतवर्षीपासून कुत्र्यांच्या नसबंदीचा विषय गांभीर्याने घेतला आहे. गतवर्षी पुणे येथील ब्लू क्रॉस या संस्थेला शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रियेचे कंत्राट देण्यात आले होते. या संस्थेची मुदत संपल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून यंदा झारखंड राज्यातील "हेल्थ ऑर्गनायझेशन फॉर पीपल्स ऍण्ड ऍनिमल ट्रस्ट' या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. या एजन्सीने शहरात काम सुरू केले आहे.

एजन्सीने कुत्रे पकडण्यासाठी नऊ प्रशिक्षित कॅचर व डॉक्‍टर असल्याचा दावा केला; मात्र शुक्रवारी कुत्रे पकडणाऱ्यालाच कुत्र्याने चावा घेतला. पदमपुरा भागात मोकाट कुत्रे पकडत असताना ही घटना घडली. सुनील ओव्हळ हे कुत्र्याला जाळीतून बाहेर काढत असताना त्यांच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला. घटनेनंतर त्यांना सिडको एन-आठ येथील महापालिकेच्या रुग्णालयात उपचाराकरिता नेले. या प्रकारामुळे कुत्रे पकडण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about dog bites