पालकांनो, मुलांना ठामपणे नाही म्हणायला शिका, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

डॉ. ना. भि. परुळेकर जयंतीनिमित्त व्याख्यान 

औरंगाबाद - "खाण्याचा सर्वांत जास्त परिणाम मेंदूवर होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले, तरी दुष्परिणाम होतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या खाण्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. जंक फूड आणि मोबाईलपासून मुलांना कटाक्षाने दूर ठेवत ठामपणे "नाही' म्हणायला शिकले पाहिजे,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे
आणि डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी दिला. 

'सकाळ'चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त "सकाळ माध्यम समूह' आणि ग्रामशिक्षण समितीतर्फे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सिडकोतील जिजामाता कन्या विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख
डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालक आणि मुलांशी संवाद साधला. यावेळी 'सकाळ' मराठवाडा आवृत्तीचे वृत्तसंपादक रणजित खंदारे, ग्रामशिक्षण समितीचे संचालक रमेश हरणे, भीमलाल हरणे, सुरेश वाकडे पाटील, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगला निकाळजे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोमल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 
रणजित खंदारे यांनी प्रास्ताविकातून डॉ. परुळेकर यांच्या जीवनकार्याची आणि "सकाळ'च्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पालकांनीही आपल्या पाल्याविषयीच्या शंकांचे आणि वर्तणुकीच्या समस्यांचे निराकरण करून घेतले. विद्यार्थ्यांनी चर्चेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला. सूत्रसंचालन शुभांगी वानखेडे यांनी केले. पर्यवेक्षिका ए. बी. पाटील, वीणा पोपळघट, पालक
प्रतिनिधी छाया जोशी, वैशाली हंडे यांनी सहकार्य केले. 

पालकांसाठी... 

  • जंक फूड, टीव्ही, मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा. 
  • आपली मुले जशी आहेत, तसा त्यांचा स्वीकार करा. 
  • अत्यंत आवश्‍यक असल्याशिवाय हट्ट पुरवू नका. 
  • मुलांचे कौतुक करा, चांगल्या कृतीला प्रतिसाद द्या. 
  • सतत चौकशा करण्यापेक्षा मुलांशी गप्पा मारा. 

विद्यार्थ्यांसाठी... 

  • जेवण, पाणी, व्यायाम, खेळ ही चतुःसूत्री पाळा. 
  • बाहेरचे पदार्थ, बिस्किटे, वेफर्स सतत खाऊ नका. 
  • करिअर करायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. 
  • काही समजले नाही, तर शिक्षकांना वर्गातच विचारा. 
  • लिहून, मोठ्याने वाचून केलेला अभ्यास लक्षात राहतो. 

मुला-मुलींचे योग्य वयात समुपदेशन होणे आवश्‍यक असते; तसेच मुलांच्या निकोप वाढीसाठी पालक-शिक्षकांनाही मार्गदर्शनाची गरज असते. दोन्ही तज्ज्ञांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या
उपक्रमाबद्दल  'सकाळ'चे विशेष आभार. 
- मंगला निकाळजे, मुख्याध्यापिका, जिजामाता कन्या विद्यालय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Dr. N. V. Parulekar Jayanti Program