संतप्त शेतकऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

"शीला-अतुल'कडून थकीत ऊस देयक मिळेना 

उस्मानाबाद : नितळी (ता. उस्मानाबाद) येथील शीला-अतुल साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 16) भीक मांगो आंदोलन केले. नकुलेश्‍वर बोरगाव (जि. लातूर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

जयलक्ष्मी नावाने सुरू असलेला साखर कारखाना शीला-अतुल प्रशासनाने चालविण्यास घेतला आहे. जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाल्यानंतर शेतकऱ्यांना 14 दिवसांत पैसे देणे अपेक्षित होते. मात्र आता सहा महिने झाले आहेत. तरीही साखर कारखान्याने एक रुपयाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, आंदोलन केले. मात्र तरीही कारखाना प्रशासन कारवाई करीत नसल्याने शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक भीक मांगो आंदोलन केले. शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आलेली असतानाही प्रशासनाला आणि सरकारला जाग येत नाही. सामान्य नागरिकाने एकदा नियम मोडला तर त्यावर कारवाई करतात. मग, कारखाना प्रशासनाला नियम नाहीत का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.

कारखान्याचे संस्थापक हे एका राजकीय पक्षाचे असल्याने कारखान्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. त्यामुळे निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत भीक मागितली. यातून जमा होणारे पैसे सरकारला आहेर म्हणून देणार असल्याचेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर राज्य किसान सभेचे अध्यक्ष तानाजी वाघमारे, पंडित बब्रुवान साळुंके, धनंजय नरसिंग साळुंके, कल्याण सुरेश साळुंके, दत्तू मारुती साळुंके, बालाजी शंकर जाधव, अमोल दयानंद साळुंके, अनंता हरिश्‍चंद्र मोरे, पोपट राजाराम बागल, देविदास बाबू शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Farmers