होळीच्या शेतकऱ्यांचे शोलेस्टाईल आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

होळी येथील जिल्हा बॅंकेच्या खातेदार शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 23) शोलेस्टाईल आंदोलन केले.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : तालुक्‍यातील होळी येथील जिल्हा बॅंकेच्या खातेदार शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 23) शोलेस्टाईल आंदोलन केले. गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांनी बॅंकेच्या विरोधात तीन तास आंदोलन केले.

 
होळी, राजेगाव, रेबेचिंचोली येथील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उमरगा तालुक्‍यातील पेठसांगवी शाखेचे खातेदार सभासद आहेत. होळी येथील खातेदारांनी वर्ष 2012 ते 2018 पर्यंतची पीकविमा रक्कम व बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहार संदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅंक व जिल्हा निबंधक सहकारी संस्था, तसेच मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारींमधील सहा मुद्यांच्या अनुषंगाने तक्रार अर्जाचा विचार करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, शेतकरी सभासदांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आंदोलनकर्ते सोमवारी सकाळी अकरा वाजता गावातील पाण्याच्या टाकीवर चढले. शोलेस्टाईल आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी तेथे आले.

आंदोनलकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. आठ दिवसांत बॅंकेची चौकशी करून खातेदारांचे पैसे देण्याचे लेखी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये व्यंकट माळी, अनिल गायकवाड, संजय मनाळे, राम बिराजदार, पांडुरंग जाधव, ज्ञानेश्वर गवळी, ओमप्रकाश कोकाटे, शेषराव जाधव, चंद्रकांत गायकवाड, लक्ष्मण शिंदे, दत्तू काळे, प्रताप जाधव, श्‍यामराव बिराजदार आदी सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Farmers