औरंगाबाद : दोन महिलांची विक्री, लग्नही लावले

प्रतीकात्मक छायाचित्र.
प्रतीकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद - रोजगाराच्या नावाखाली शहरातून दोन महिलांना औरंगाबादेत बोलावत त्यांची अन्य राज्यात विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. त्यातील एका महिलेची औरंगाबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातून सुटका केली. याप्रकरणी औरंगाबादेतील पाच व मध्यप्रदेशातील चौघे अशा एकूण नऊ जणांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात मानवी तस्करीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यात दोघांना अटकही करण्यात आली आहे. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रुग्णालयात रोजगार मिळवून देण्याचे आश्‍वासन रंजनाबाई नामक महिलेने ओळखीतील अनामिका (नाव बदलले आहे.) हिला दिले. तिने रंजनाबाईच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून दोन मुलांना जालना जिल्ह्यातील माहेरी नेऊन सोडले. यानंतर अनामिका व तिची चुलत बहीण अवनी (नाव बदलले) या दोघी औरंगाबादेत आल्या; परंतु रंजनाबाईने दोघींना रोजगार न देता जिजाबाई, इतर दोन महिला व शिवाजी धनेधर यांच्या साथीने मध्यप्रदेशात ऐंशी हजारांना विकले. दोघींचा मध्यप्रदेशातील उज्जैनजवळील दोन वेगवेगळ्या गावातील व्यक्तींसोबत बॉण्ड लिहून विवाह लावले. कामासाठी गेलेल्या दोघी न परतल्याने अनामिकाच्या आईने औरंगाबादेत चौकशी केली. त्यावेळी रंजनाबाईबाबत त्यांना गंभीर माहिती समजली. गरजू महिलांना ती थाप मारून त्यांची इतर राज्यात विक्री करीत असल्याची बाब समजल्यानंतर अनामिकाच्या आईने जवाहर पोलिस ठाण्यात दोन मुली हरवल्याबाबत तक्रार दिली व घडलेल्या प्रकाराची माहितीही दिली. त्यानुसार रंजनाबाई, जिजाबाई व शिवाजी धनेधर यांना ठाण्यात बोलावून पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी अनामिका व अवनी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे असल्याची माहिती संशयित तिघांनी दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक भरत पाचोळे, सहायक फौजदार दत्तात्रय बोटके, माणिक हिवाळे, संदीप जाधव, गजेंद्र शिंगणे, कृष्णा बोऱ्हाडे, समाधान काळे, दीपाली कोहचाडे यांनी अनामिकाला उज्जैन येथून सुखरूप आणले. अनामिकाच्या आईच्या तक्रारीनुसार, औरंगाबादेतील पाच आणि मध्यप्रदेशातील चौघांविरुद्ध मानवी तस्करीची गुन्ह्याची नोंद झाली. यात रंजनाबाई, जिजाबाई या दोघींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
त्यांना आणताना नाकीनऊ 
सुरवातीला अनामिका व अवनीचे कुटुंबीय व शिवाजी धनेधर याला सोबत घेऊन पोलिसांनी उज्जैन गाठले. त्यांना तेथून परत आणण्यास संबंधित स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे दोघींच्या सुटकेसाठी एक पोलिस पथक उज्जैनजवळील मकला गावी गेले व शिताफीने कोंडून ठेवलेल्या अनामिकाची त्यांनी सुटका केली. तिला घेऊन सोमवारी रात्री पथक औरंगाबादेत पोचले. 
 
अशी झाली सुटका 
अनामिकाने स्वखुशीने बॉण्डवर विवाह केल्याने तिला घेऊन जाता येणार नाही, असे संबंधितांचे म्हणणे होते; परंतु तिने न्यायालयासमोर असे सांगितल्यास परत जाऊ अशी पोलिसांनी भूमिका घेतली. अनामिकाला न्यायालयात हजर केले. त्यावेळी आपली विक्री करून जबरीने लग्न लावल्याचे तिने न्यायालयासमोर सांगितले. यानंतर न्यायालयाने तिला औरंगाबादला जाण्याची परवानगी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com