औद्योगिक पाणीपुरवठा कात टाकणार

आदित्य वाघमारे
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

औरंगाबाद - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) शेंद्रा, चिकलठाणा आणि शेंद्रातील औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कात टाकणार आहे.

औरंगाबाद - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) शेंद्रा, चिकलठाणा आणि शेंद्रातील औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कात टाकणार आहे.

सुमारे 70 कोटींचा खर्च करून वाळूज-चिकलठाणा आणि चिकलठाणा-शेंद्रा या औद्योगिक वसाहतींच्या जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. डिसेंबर 2020 पर्यंत ही बदललेली वाहिनी कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली.  शेंद्रा, जालना आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा अनेकदा तुटवडा निर्माण होतो. गळत्या आणि जुनाट झालेल्या वाहिनीतून पाणीपुरवठा करणे अवघड होत असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

शेंद्रा ते जालना ही जलवाहिनी ही सुमारे 35 किलोमीटर लांब असून, या शहरातील तीनही औद्योगिक वसाहतींना पाणी देण्याचे काम करते. सध्या यातून जास्तीत जास्त आठ एमएलडी एवढाच पाणीपुरवठा करता येतो. जालन्याची मागणी 12 एमएलडीच्या घरात असल्याने नव्या वाहिनीची क्षमताही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीआय के सेव्हन प्रकारचे पाइप यासाठी वापरण्यात येणार असून, ही क्षमता 15 एमएलडीवर नेण्याची तयारी एमआयडीसीने केली आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाऱ्या जलवाहिनीमध्ये असलेल्या गळत्या आणि जीर्ण अवस्थेने क्षमतेवर होणारा विपरीत परिणाम ध्यानी घेऊन वाळूज ते शेंद्रा ही 42 किलोमीटरची वाहिनी बदलण्यात (क्षमता तेवढीच राहणार) येणार आहे. या कामासाठी एमआयडीसी 68 कोटी 45 लाखांची रक्कम खर्च करणार आहे. 
  
72 एमएलडीच्या वाहिनीसह कार्यान्वित 
जायकवाडी धरणातून शेंद्रा डीएमआयसी आणि जालना औद्योगिक वसाहतींमध्ये पाणी पोचविण्यासाठी तयार करण्यात येत असलेली 72 एमएलडी क्षमतेची वाहिनी ही येत्या वर्षाच्या शेवटी कार्यान्वित होणार आहे. तोपर्यंत वाळूज-चिकलठाणा आणि शेंद्रा-जालना ही वाहिनी बदलण्याचे काम हाती घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न एमआयडीसीचा आहे. डिसेंबर 2020 पर्यंत या दोन्ही वाहिन्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा प्रयत्न एमआयडीसीचा असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 
  
तेवढ्याच जागेत करणार काम 
विद्यमान जलवाहिनी बदलण्यासाठी आहे त्या जागेचा वापर केला जाणार आहे. टप्प्याटप्प्यांत हे काम हाती घेण्यात येणार आहे. सेक्‍शन करून पाण्याचा पुरवठा अविरत ठेवण्यासाठी वाहिनीला डायव्हर्जन (दुसरी तात्पुरती वाहिनी) जोडण्यात येणार आहे. 2035 पर्यंतची गरज ध्यानी घेऊन हे काम एमआयडीसी करणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया झाल्यावर बारा महिन्यांत हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी डिसेंबर 2020 पर्यंतचा कालावधी लागणार आहे. 
 
 

जीर्ण झालेल्या वाहिनीची दुरुस्ती केली तरी त्या जुनाट झाल्याने चिकलठाण्यास पूर्ण क्षमतेने पाणी देणे शक्‍य होत नाही. जालन्यातील वसाहतींची मागणीही वाढती आहे.
चिकलठाण्यापर्यंत आलेली वाहिनी बदलण्यात येणार आहे. शेंद्रा ते जालन्यापर्यंतची 42 किलोमीटरची वाहिनी पाणीपुरवठ्याची क्षमता वाढविणारी ठरेल. 
- भूषण हर्षे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Industrial water supply