Covid warriors : चिमुकलीला बाधा, पण कोरोनालाही घाबरलं नाही आईचं काळीज

दिलीप गंभिरे
शुक्रवार, 22 मे 2020

अख्खं जग कोरोनाला घाबरून घरात बसलेले असतानाही या आईचे काळीज कोरोनालाही घाबरले नसल्याची प्रचिती या घटनेमुळे आली.

कळंब, (जि. उस्मानाबाद) : जन्मास येण्यापूर्वी गर्भातील कोवळा जीव जिवापाड जपणारी आईच असते. तेच मूल जर भविष्यात मृत्यूच्या दारात असेल तर आपला जीव धोक्यात घालणारीही आईच असते. याची प्रचिती, म्हणजे वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील अवघ्या सहा वर्षांच्या मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून, येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत आहे. तिची आई थेट रुग्णालयात थांबली असून, मुलींसाठी ही जन्मदात्री आजाराच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळे अख्खं जग कोरोनाला घाबरून घरात बसलेले असतानाही या आईचे काळीज कोरोनालाही घाबरले नसल्याची प्रचिती या घटनेमुळे आली.

तीन दिवसांपूर्वी ही महिला आपल्या मुलीसह मुंबईहून वाशी येथे आली होती. त्याचे स्वॅब नमुने वाशीच्या प्रशासनाने तपासणी साठी पाठविले होते. मुलीच्या आईचा अहवाल निगेटिव्ह आला. मुलीचा मात्र अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात पहिल्यांदाच एका लहान मुलीला कोरोना ची बाधा झाली. या मुलीला शुक्रवारी (ता. २२) औषध उपचारांसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असल्याचे वेधकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
 
अहवाल निगेटिव्ह, पण चिमुकलीसाठी रुग्णालयात 
सध्याच्या परिस्थितीत एखादा व्यक्ती शिंकली, खोकलली, तर इतर लोक चार हात लांब पळतात. मात्र, या सहा वर्षांच्या चिमुकलीवर ओढवलेल्या परिस्थितीत तिची आई तिच्या सोबत उभी आहे. यासाठी तिच्या उपचारासाठी आईही रुग्णालयात दाखल झाली आहे. या चिमुकलीच्या आईचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. चिमुकलीची प्रकृती स्थिर असून, औषध उपचार सुरू आहेत.
 
कठीणप्रसंगी आई आपल्या लेकरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते. याचे जिवंत उदाहरण येथील उपजिल्हा रुग्ण लयात पाहावयास मिळाले आहे. मुलीवर संकट आले म्हणून खचून न जाता मुलीसोबत थांबून कोरोना हरविण्याचा एकप्रकारे निर्धार या आईने आहे. मुलीला आपल्या भावनेतून कोरोनाशी झुंज देण्यास बळ देत आहे. तू घाबरू नको, तुला काही होणार नाही, होऊ देणार नाही, भिऊ नकोस आई तुझ्या पाठीशी आहे, असा धीर देत आहे. कोरोना म्हणजे काय ते चिमुकलीला काय माहीत पण ती आज कोरोनाशी झुंज देत आहे. तिला लढण्याचे बळ आई देत आहे हे मात्र नक्की आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Kalamb's Covid warrior mother