महावितरण थकबाकीदार ग्राहकांच्या घरासमोर वाजणार ढोल

अनिल जमधडे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

महावितरणच्या घरगुती, व्यापारी व औघोगिक अशा 848 कोटी पैकी अशा एक लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांकडे तब्बल 231 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सदर मोहिमेत थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यापुर्वी थकबाकीदार ग्राहकांच्या घरासमोर ध्वनीक्षेपणाद्वारे पाच ते दहा मिनिट घोषणा देऊन ढोलताशा वाजवण्यात येणार आहे.

औरंगाबाद,  : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत मराठवाडयातील आठ जिल्हयात मोठया प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्यांच्या दारात ढोल ताशांचा गजर करुन वसुली करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

महावितरणतर्फे प्रचंड थकबाकी वसुलीसाठी 18 सप्टेंबर पासून मोहिम सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या घरगुती, व्यापारी व औघोगिक अशा 848 कोटी पैकी अशा एक लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ग्राहकांकडे तब्बल 231 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सदर मोहिमेत थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यापुर्वी थकबाकीदार ग्राहकांच्या घरासमोर ध्वनीक्षेपणाद्वारे पाच ते दहा मिनिट घोषणा देऊन ढोलताशा वाजवण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडीओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांची वीज बिलाची तक्रार असेल त्यांनी महावितरणच्या कार्यालयात तात्काळ तक्रार दाखल करून 18 सप्टेंबर पूर्वी शंकेचे निराकरण व बिल दुरूस्ती करून घ्यावे. ज्या ग्राहकांची सर्वात जास्त थकबाकी आहे, त्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा सर्वप्रथम खंडित करण्यात येईल. या कारवाईत वीज बिलाची थकबाकी असलेल्या आजी, माजी व भावी लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच गुंड प्रवृतीचे व्यक्ती यांचा प्राधान्याने वीज पुरवठा खंडित करण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कारवाई दरम्यान स्थानिक माध्यम प्रतिनिधींनाही निमंत्रीत करण्यात येणार आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about mahavitran