प्रा. सावंत यांच्या पुत्राच्या विवाहास ठाकरेंची पाठ

भैरवनाथ शुगर वर्क (ता. परंडा) : स्व. जयवंतराव सावंत प्रतिष्ठानतर्फे रविवारी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरांना शुभेच्छा देताना अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.
भैरवनाथ शुगर वर्क (ता. परंडा) : स्व. जयवंतराव सावंत प्रतिष्ठानतर्फे रविवारी झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरांना शुभेच्छा देताना अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड.

उस्मानाबाद : आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या चिरंजीवाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी न लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावल्याने चर्चेत आखणी भर पडली. आपल्याच पक्षाच्या (शिवसेना) विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे प्रा. सावंत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता ठाकरे यांनी प्रा. सावंत यांच्या निमंत्रणाकडे पाठ फिरविल्याने काय द्यायचा तो संदेश त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे. प्रा. सावंत यांचे "मातोश्री'शी नाते पुन्हा घट्ट होणार, अशा चर्चेलाही सध्यातरी ब्रेक लागल्याचे बोलले जात आहे. 

आमदार प्रा. सावंत हे गेल्या काही वर्षांत "मातोश्री'च्या आशीर्वादाने शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील महत्त्वाचे नेते बनले होते. शिवसेनेचे उपनेतेपद, तसेच विधानपरिषदेचे आमदार, त्यानंतर दोन जिल्ह्यांचे संपर्कप्रमुखपद अशी बक्षिसे त्यांनी मिळविली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शेवटच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जलसंधारण खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत भरघोस मते मिळवून विजयी होत त्यांनी सर्वांनाच धक्का दिला.

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींचा प्रा. सावंत यांना फटका बसला. महाआघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी पक्षप्रमुखांजवळ नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी प्रा. सावंत यांना बेदखल केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. 


मंत्रिपद न मिळाल्याने नाराज प्रा. सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाविरोधात भूमिका घेत भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेली आढावा बैठक, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही सावंत यांनी दांडी मारली होती. भूममध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पक्षाविरोधात काही वक्तव्य करीत एकप्रकारे आपली पुढील दिशाच स्पष्ट केली होती. 14 फेब्रुवारीला सावंत व भाजपचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट झाल्याने भाजपशी सलोखा, शिवसेनेशी दुरावा केल्याच्याही चर्चेला तोंड फुटले. 

स्व. जयवंतराव सावंत प्रतिष्ठान वाकाव (जि. सोलापूर) यांच्या वतीने भैरवनाथ शुगर वर्क्‍स, सोनारी (ता. परंडा) येथे रविवारी (ता. 16) आयोजित 20 वा सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत 111 जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधल्या गेल्या. यंदाच्या विवाह सोहळ्यात माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज व भैरवनाथ कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत यांचे सुपुत्र ऋतुराज यांच्यासह अनेक जोडपी विवाहबंधनात अडकली.

या सोहळ्याचे निमंत्रण प्रा. सावंत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले होते. ते सोहळ्याला उपस्थित राहतील असे सांगण्यात येत होते. प्रा. सावंत यांनी त्यादृष्टीने जय्यत तयारी केली होती; त्यामुळे सावंत यांचे "मातोश्री'शी नाते पुन्हा घट्ट होणार, अशी चर्चा सुरू झाली; परंतु निमंत्रणाचा स्वीकार करूनही ठाकरे यांनी सोहळ्याला येण्याचे टाळल्याने या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com