गूढ आवाजाने हादरली खिडक्यांची तावदाने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात गूढ आवाजाची मालिका सुरुच आहे. हा आवाज नेमका कसा अन् का होतो, याचे गूढ कायम आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील परंडा, भूम तालुक्यांतील काही भागांत मंगळवारी (ता.. २५) दुपारी एक वाजून ३७ मिनिटांनी गूढ आवाज झाला. या आवाजाने खिडक्यांची तावदाने हादरली. मोठा आवाज झाल्यानंतर परंडा शहरातील अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गूढ आवाज होण्याचे प्रकार वाढले आहेत. हे आवाज नेमके कशामुळे होत आहेत, याचे कारण अद्यापही समोर आले नाही. मंगळवारी दुपारी एक वाजून ३७ मिनिटांनी परंडा शहरासह परिसरात जमिनीतून गूढ आवाज झाला.  याशिवाय भूम तालुक्यातील ईट, पाथरुड, कळंब तालुक्यातील खामसवाडी भागांत हा आवाज झाला.

खामसवाडी (ता.. कळंब) परिसरात गूढ आवाजामुळे खिडक्यांची तावदाने हादरली. शाळेवरील पत्रे हादरल्याचे तेथील शिक्षकांनी सांगितले. भूम तालुक्यातील ईट, डोकेवाडी, गिरवली, पाथरुड, पाटसांगवी, जांब, वालवड परिसरात हा आवाज झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

क्लिक करा- दूध संकलन केंद्रांवर छापे, आष्टीत भेसळयुक्त दूधाचा गोरखधंदा

परंडा शहरात दुपारी एक वाजून ३७ मिनिटांनी मोठा गूढ आवाज झाला. या गूढ आवाजाने घरातील लहान मुले, महिला नागरिक घराबाहेर आले. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात गूढ आवाजाची मालिका सुरुच आहे. हा आवाज नेमका कसा अन् का होतो, याचे गूढ कायम आहे.

हेही वाचा- पाण्यासाठी भाजपचा लातूर महापालिकेत ठिय्या, सतरा दिवसांपासून निर्जळी

नागरिक दैनंदिन कामांत दुपारच्या सुमारास व्यस्त असताना हा गूढ आवाज ऐकू आला. भूवैज्ञानिकांनाही या गूढ आवाजाचा उलगडा अद्याप झाला नाही. सतत अधूनमधून धडकी भरणारे गूढ आवाज होत आहेत. 
खामसवाडीसह परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या गूढ आवाजाने घरातील खिडक्यांची तावदाने मोठ्याने हादरली असल्याचे ग्रामस्थ दिपक पाटील यांनी सांगितले. तसेच शाळेवरील पत्रे हादरल्याचे जगदंबा प्रशालेचे शिक्षक डिकले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about osmanabad