कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पन्नास लाखांची तरतूद

तानाजी जाधवर
रविवार, 29 मार्च 2020

आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून, मतदारसंघातील आरोग्य सुविधेसाठी हा निधी वापरण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आमदार निधीतून पन्नास लाखांची तरतूद केली आहे. याबाबत आमदार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून, मतदारसंघातील आरोग्य सुविधेसाठी हा निधी वापरण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की राज्यावर सध्या आणीबाणीची परिस्थिती असून मोठ्या आर्थिक मदतीची गरज भासत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली असून, अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्व ओळखून मदतीचा हात देण्याची गरज आहे. आमदार म्हणून मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचाऱ्यांसाठी आमदार निधीतून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

आमदार निधीतील पन्नास लाख रुपयांची तरतूद या कामासाठी केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अतिदक्षता कक्षाची आवश्यकता भासते. व्हेंटिलेटर व इतर अत्याधुनिक सुविधा आवश्यक असतात. मात्र, कळंब येथे ही सुविधा नसल्याने पुढील अडचणीची शक्यता ओळखून अतिदक्षता कक्षासाठी पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह आरोग्य विभागातील इतर कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट उपलब्ध करण्यासाठी दहा लाखांचा निधी दिला आहे. तर जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीआयपीएपी मशीन खरेदी करण्यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा - इस्लापूर येथून परतलेले मजूर विलगीकरण कक्षात

मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी इन्फ्रारेड थर्मामीटर्सची सोय करण्यात येणार आहे. त्याच्या खरेदीसाठी पाच लाख रुपये निधी देण्यात आला आहे. शिवाय या सर्व केंद्रांवरील डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करून देण्यासाठी तीन लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील सर्व कोरोना सहायता कक्षाच्या माध्यमातून सॅनिटायझर व मास्क वितरित करण्यासाठी सात लाखांचा निधी देण्यात आलेला आहे. असा एकूण पन्नास लाखांचा निधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात आल्याची माहिती आमदार घाडगे पाटील यांनी दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Osmanabad