आम्हाला गावी सुखरूप सोडा

जावेद इनामदार
रविवार, 29 मार्च 2020

मुंबई, पुण्यात कामानिमित्त वास्तव्यास असलेले अनेक कामगार कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपापले गाव जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र संचारबंदी अन्‌ जिल्हाच्या सीमाबंदीमुळे या मजूर, कामगारांना गावाकडे जाता येत नसल्याचे चित्र आहे.

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरातील अनेक मजूर मुंबई व पुणे येथे गेल्या अनेक वर्षांपासून रोजगारासाठी गेले आहेत. मात्र या दोन्ही शहरांत सध्या कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे अनेकजण आपले मूळ गाव गाठण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावांचा रस्ता अनेकांनी पकडला आहे.

मात्र संचारबंदीमुळे यापैकी काहीजण रस्त्यात, तर काहीजण आहे त्या ठिकाणीच वाहन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने शहरी भागात असलेल्या अशा कामगारांची गावनिहाय यादी करून अडकलेल्या या लोकांना आपापल्या गावी सुखरूप सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मजूर व त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

हेही वाचा - इस्लापूर येथून परतलेले मजूर विलगीकरण कक्षात

मुंबई, पुण्यात कामानिमित्त वास्तव्यास असलेले अनेक कामगार कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपापले गाव जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र संचारबंदी अन्‌ जिल्हाच्या सीमाबंदीमुळे या मजूर, कामगारांना गावाकडे जाता येत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील अनेक तरुण व शेतमजूर कामानिमित्त पुणे, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. कोरोना आजारामुळे अनेकांनी संचारबंदी लागण्यापूर्वीच आपले गाव गाठले आहे. तर संचारबंदीमुळे हातावर पोट असलेल्या अनेक तरुणांचे रोजगार गेले. कंपन्या बंद झाल्या, बांधकाम व विकासकामे थांबली.

परिणामी हाताला काम नसल्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. काम नाही, त्यात कोरोनाची भीती, यामुळे अनेकांनी आपापल्या गावांचा रस्ता पकडला आहे. मात्र गावी जाण्यासाठी वाहनच मिळत नसल्याने कामगार अडचणीत आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या एखादा ट्रक किंवा टँकरमधून, तसेच काही कसेबसे पायपीट करीत गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पोलिसांनी ट्रक किंवा टँकर अडवला की त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला जात आहे. खासगी वाहनांतून प्रवास करण्यासही बंदी आहे.

एसटी बस, ट्रॅव्हल्स, रेल्वे या सेवा एकाच वेळी बंद झाल्याने परिसरातील शेकडो कामगार शहरी भागातच अडकले आहेत. जिल्हाबंदीमुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मुंबईवरून निघालेल्या वाहनांना कळंबोली व तळेगाव टोलनाक्यावर तर पुण्यातून निघालेल्या वाहनांना पाटस टोलनाका, उजनी धरण, मोहोळ, बोरामणी, इटकळ आदी ठिकाणी अडवून पोलिस वाहनांची तपासणी करीत आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहनचालकही प्रवासी घेणे टाळत आहेत. त्यामुळे गाव गाठण्याची इच्छा असणारे शेकडो कामगार गावी येण्यासाठी वाहन मिळत नसल्याने शहरातच अडकले आहेत.

राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून अशा कामगारांची यादी करून त्यांना सुखरूप गावी आणून सोडावे, अशी मागणी रस्त्यात अडकलेले कामगार, तसेच गावातील नातेवाइकांकडून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Osmanabad